घरमुंबईपाणीपुरीच्या तिखटगोड पाण्यात सापडल्या अळ्या

पाणीपुरीच्या तिखटगोड पाण्यात सापडल्या अळ्या

Subscribe

तुम्हाला देखील चटपटीत पाणीपुरी खाण्याची सवय आहे. मग ही बातमी तुमच्यासाठी आहे.

पाणीपुरी खाताय! पण जरा जपून तुमचा पाणीपुरीवाला भैया तिखटगोड पाणी कुठले वापरतो, त्यात अळ्या तर नाही ना?जरा बघून खा! कारण मुलुंड मधील एका ठेल्यावर पाणीपुरीच्या तिखटगोड पाण्यात चक्क अळ्या आढळून आल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी माजी नगरसेविकेने महानगर पालिकेत तक्रार केली असून पाणीपुरी ठेल्यावर कारवाईची मागणी केली आहे.

मुलुंड पूर्व येथील एका ब्युटीपार्लर मध्ये काम करणाऱ्या संतोषी पाटील यांनी गेल्या आठवड्यात मुलुंड पूर्व खंडोबा मंदिर परिसरात असणाऱ्या पाणीपुरीच्या ठेल्यावरून संध्याकाळच्या वेळी पार्सल पाणीपुरी मागवल्या होत्या. पाणीपुरी खात असताना तिखटगोड पाण्यात त्यांना पांढऱ्या रंगाचे अळी सारखे दिसून आले, त्यांनी निरखून बघितले असता ती खरोखरच एक मृत अळी होती. संतोषी आणि तिच्या मैत्रिणीने अगोदरच काही पाणीपुरी फस्त केल्या होत्या, मात्र तिखटगोड पाण्यात अळी बघताच दोघींना मळमळून आले. त्यांनी प्रथम तिखटगोड पाण्यातील अळीचे मोबाईल फोनमध्ये फोटो काढून जाब विचारण्यासाठी पाणीपुरीच्या ठेल्यावर गेल्या आणि त्यांनी पाणीपुरी दुकानदाराला जाब विचारला असता त्याने ही बाब किरकोळ असल्यासारखे उत्तर संतोषी पाटील यांना दिले.

- Advertisement -

हा प्रकार जवळपासच्या रहिवाशांना कळताच त्यांनी ही बाब मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता पाठक यांच्या लक्षात आणून दिली. त्या नंतर काही रहिवाश्यांनी अळी सापडलेले पाणी आणि त्याचे फोटो मोठे करून बॅनर बनवून खंडोबा मंदिराबाहेर लावण्यात आले. या बॅनरवर येथील ठेल्यावर पाणीपुरी खाऊ नये, असेही लिहण्यात आले आहे. हा किळसवाणा प्रकार घडून देखील पाणीपुरीचा ठेला बिनदिक्कतपणे सुरू होता. अखेर मनसेच्या माजी नगरसेविका यांनी मनपाच्या ‘टी’ वार्डच्या आरोग्य विभागाला तसेच सहाय्यक मनपा आयुक्त टी वॉर्ड यांना लेखी तक्रार अर्ज केला असून त्यात त्यांनी पाणीपुरीच्या ठेल्यावर तसेच खाद्य पदार्थ उघड्यावर विक्री करणाऱ्या फेरीवाल्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच उघड्यावरील खाद्य पदार्थ खाण्यासाठी योग्य नसून ते खाणे टाळावे, असेही आवाहन माजी नगरसेविका पाठक यांनी केले आहे.

या बाबत मनपा सहाय्यक आयुक्त यांच्याकडे संपर्क साधला असता आमच्याकडे लेखी तक्रार आली असून त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.

आमच्याकडे याबाबत कालच तक्रार आली होती, त्या अनुषंगाने आम्ही रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यावर कारवाई केलेली असून यापूर्वी देखील कारवाई करण्यात आलेली होती. यापुढेही कारवाई सुरू राहील. लोकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नये.किशोर गांधी, मनपा सहाय्यक आयुक्त टी वॉर्ड

मी जेव्हा पाणीपुरीच्या ठेल्यावर भैयाला जाब विचारण्यासाठी गेले असता “अरे मॅडम हमे भी समझमे नही आ रहा ,यह कीडा कैसे आ गया, इसके आगे ध्यान रखेंगे”, असे बोलून जशी काही ही किरकोळ बाब असल्यासारखे दाखवत होता. पाणीपुरीच्या तिखगोड पाण्यात अळी सापडल्याने मला तर अक्षरशः मळमळायला झाले होते. – संतोषी पाटील, तक्रारदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -