घरमुंबईमुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर ‘व्हीजन झीरो प्रोजेक्ट’चा शुभारंभ

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर ‘व्हीजन झीरो प्रोजेक्ट’चा शुभारंभ

Subscribe

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने शुक्रवारी सेव्ह लाइफ फाऊंडेशन, व्होलक्सवॅगन ग्रुपच्या सहकार्याने ‘व्हीजन झीरो प्रोजेक्ट’चा शुभारंभ केला.

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने शुक्रवारी सेव्ह लाइफ फाऊंडेशन, व्होलक्सवॅगन ग्रुपच्या सहकार्याने ‘व्हीजन झीरो प्रोजेक्ट’चा शुभारंभ केला. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग हा सर्वाधिक रहदारीचा आणि दोन्ही बाजूला नागरी वस्ती असलेला महामार्ग आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पर्यायी रस्ता म्हणून हा महामार्ग ओळखला जातो. या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यासोबत सेव्ह लाइफ फाऊंडेशन, व्होलक्सवॅगन ग्रुप, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि गृह विभाग यांनी एकत्रितपणे राष्ट्रीय महामार्ग ४८ वर ‘व्हीजन झीरो प्रोजेक्ट’चा शुभारंभ केला. राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत बांठिया, अप्पर पोलीस महासंचालक (महामार्ग पोलीस) विनय करगांवकर, व्होलक्सवॅगन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गुरप्रताप बोपाराय यांच्या विशेष उपस्थितीत हा शुभारंभ पार पडला. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि सेव्ह लाइफ फाऊंडेशनचे सीईओ पियुष तिवारी उपस्थितीत होते.

एकनाथ शिंदेनी केले कौतुक

या उपक्रमाची मुहूर्तमेढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापरिवर्तन अभियानांतर्गत फेब्रुवारी २०१९ मध्ये रोवली होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. महामंडळाचे मॉडेल देशभरातील महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर राबविले गेले पाहिजे, असे ते म्हणाले.

- Advertisement -

‘८० टक्के अपघात हे मानवी चुकीमुळेच’

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी २०१६ साली महामंडळाने सेव्ह लाइफ फाऊंडेशनबरोबर सामंजस्य करार केला होता. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील ‘व्हीजन झीरो प्रोजेक्ट’ शुभारंभाच्या वेळी राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत बांठिया यांनी महामंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी अप्पर पोलीस महासंचालक (महामार्ग पोलीस) विनय करगांवकर म्हणाले, ‘रस्त्यावरील ८० टक्के अपघात हे मानवी चुकीमुळे होतात. अति वेग, सीट बेल्ट, हेल्मेटचा वापर न करणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे या चार गोष्टी अपघाताला कारणीभूत आहेत. अपघात रोखण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी होईलच. पण, प्रत्येक वाहनचालकाला स्वत:हून वाटले पाहिजे की, कुठल्याही अपघाताला मी कारण नसेल. लोकांचे प्रशिक्षण गरजेचे आहे. महामंडळाच्या ‘व्हीजन झीरो’ हा कौतुकास्पद उपक्रम असून यात पोलिसांचे सहकार्य असेल.’

‘कायद्यात दंडाची तरतूद, पण अंमलबजावणी गरजेचे’

महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी या मोहिमेत सहभागी होत असल्याबद्दल महामार्ग पोलीस, व्होलक्सवॅगन ग्रुप यांचे आभार मानले. ‘सेव्ह लाइफ फाऊंडेशनच्या माध्यमातून महामंडळाने यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना अंमलात आणल्या. त्याच पद्धतीने आता मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यासाठी ‘व्हीजन झीरो’ या मोहीमेला प्रारंभ झाला आहे. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आवश्यक तेथे अभियांत्रिकी उपाय करण्यात येतील. मात्र, लोकांचा सहभागही तेवढाच आवश्यक आहे. कायद्यात दंडाची तरतूद आहे. पण त्याची अंमलबजावणी कठोरपणे करणे गरजेचे आहे’, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -