घरमुंबईबाबुराव २७ वर्षांचा झाला ! अनोखी कहाणी माथेरानमधील घोड्याची

बाबुराव २७ वर्षांचा झाला ! अनोखी कहाणी माथेरानमधील घोड्याची

Subscribe

माणूस आणि घोडा यांचे सख्य किंवा नाते पूर्वीपासून राहिलेले आहे. पूर्वी युद्धासाठी घोडा हेच महत्त्वाचे साधन होते. रुबाबदार घोडा हा सर्वांचेच आकर्षण राहिला आहे. अलिकडे राष्ट्रपतींच्या अंगरक्षक दलातील घोडा १९ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाला तेव्हा त्याचे झालेले कौतुक सर्वांनीच पाहिले. स्वाभाविक येथे सुद्धा दळणवळणाचे किंबहुना अर्थकारणाचे मुख्य साधन असलेला घोडा हा नेहमीच कौतुकाचा विषय राहिला आहे. असेच कौतुक सध्या २७ वर्षीय ‘बाबुराव’ नावाच्या घोड्याचे होत आहे. जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गिरिस्थानावर परिसराचा फेरफटका मारण्यासाठी घोड्याला प्राधान्य दिले जाते.

घोडा ही माथेरानची वेगळी ओळख असून याच घोड्यांच्या व्यवसायावर ४० टक्के सर्वसामान्य कुटुंबे अवलंबून आहेत. आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे स्थानिक अश्वपालक या घोड्यांची विशेष काळजी घेत असतो. यामुळे घोड्याचे आयुष्य साधारणपणे २० वर्षे असले तरी काही घोडे त्यांच्या वयोमानापेक्षा अधिक काळ जगल्याचे समोर आलेले आहे. अश्वपालक चंद्रकांत म्हामुणकर यांनी १९९९ साली आपला उदरनिर्वाह चालावा यासाठी नाशिक जिल्ह्यातील येवला येथील शेतकर्‍याकडून घोडा विकत घेतला. लाडाने त्याचे नाव ‘बाबुराव’ असे ठेवण्यात आले. हा घोडा म्हामुणकर परिवारासाठी ‘लकी’ ठरला आहे. वयोमानानुसार कमानीप्रमाणे पाठीत वाकलेल्या २७ वर्षीय बाबुरावला बाजारपेठेत फक्त फेरफटका मारण्यासाठी, तसेच औषधोपचार करण्यासाठी महिन्यातून दोन-तीन वेळा तबेल्यातून बाहेर काढला जातो.

- Advertisement -

या घोड्याची कुटुंबातील सदस्याप्रमाणे विशेष देखभाल केली जाते. सन 2000 मध्ये त्यावेळचे नामांकित पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वेलणकर यांनी या घोड्याला अर्थात बाबुरावला ‘वय वर्षे ६’ असे फिटनेस प्रमाणपत्र दिले होते. यामुळे महालक्ष्मी रेसकोर्सवरील शर्यतीत तो २००० आणि २००१ मध्ये सहभागी झाला होता. घोडा व्यवसाय हा स्थानिक अश्वपालक आणि पर्यटकांसाठी महत्त्वाचा दुवा ठरत आहे. येणारे श्रीमंत पर्यटक आणि सर्वसामान्य अश्वपालकांची या घोड्यांमुळेच घट्ट नाळ जुळली आहे. कोरोना संकटकाळात दानशूर पर्यटकांकडून माथेरानकरांना मदतीचा हात दिला गेला होता. याच घोड्यांच्या प्रेमाखातर आज देखील देश-विदेशातील अनेक हौशी पर्यटक येथे भेट देतात आणि घोडेस्वारीचा मनमुराद आनंद घेतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -