
मुंबईः मुबई मेट्रो २ अ व मेट्रो ७ चा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. गुरुवारी, १९ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गिकेचा आढावा घेतला. त्यानंतर एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही. आर. श्रीनिवास यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या मार्गिकेच्या कामाची माहिती घेतली.
19 जानेवारीपासून मेट्रो 2 अ ( दहिसर- डीएन नगर) मार्गिकेतील डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो 7 ( दहिसर ते अंधेरी) मार्गिकेतील गोरेगाव- गुंदवली हा दुसरा टप्पा मुंबईकरांसाठी खुला होणार आहे. या मार्गिकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याने एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे. अंतिम टप्प्यातील सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहेत. या कामांचा एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांनी आढावा घेतला. प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
“Mumbai gets its First Metro Network. Three metro lines ( Line 1, 2A and 7 ) join and seek to give interoperability & seamless travel to Mumbaikars,
said Shri S.V.R. Srinivas, IAS, Hon Metropolitan Commisioner, MMRDA pic.twitter.com/MQWyhskVK0— MMRDA (@MMRDAOfficial) January 13, 2023
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत आणि आसपासच्या शहरांत 350 किमीहून अधिक लांबीचे मेट्रो नेटवर्क उभं करण्याचं शासनाचं नियोजन आहे. मेट्रोची 2 अ अर्थात दुसरा टप्पा दहिसर पश्चिम ते डीएन नगरपर्यंत असेल. यासाठी जवळपास 6410 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या मार्गाची लांबी 18.6 किलोमीटर इतकी असून या मार्गावर 17 स्थानकांवर थांबा असणार आहे. अंधेरी पश्चिम, ओशिवारा, लोअर ओशिवरा, गोरेगाव पश्चिम, पहाडी गोरेगाव, लोअर मालाड, मालाड पश्चिम, वनराई, डहाणूकरवाडी, कांदिवली पश्चिम, पहाडी एकसर, बोरिवली पश्चिम, खंडारपाडा, आनंदनगर, दहिसर पश्चिम, मांडपेश्वर या ठिकाणी थांबा असेल.
मेट्रो लाइन 7 ही अंधेरी ते दहिसरपर्यंत असणार आहे. हा मार्ग वेस्टर्न एक्सप्रेससह 16.5 किलोमीटरपर्यंत आहे. यासाठी 6208 कोटी रुपये इतका खर्च आला आहे. या मेट्रो मार्गावर 13 स्टेशनवर थांबा असणार आहे. गेश्वरी पूर्व, गोरेगाव पूर्व, आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाडा, नॅशनल पार्क, ओवरीपाडा इथे मेट्रो मार्ग थांबेल.