घरमुंबईभारतात सर्वाधिक रुग्ण हार्ट फेल्युअरने दगावतात

भारतात सर्वाधिक रुग्ण हार्ट फेल्युअरने दगावतात

Subscribe

भारतात हार्ट फेल्युअर हा विकार होणाऱ्या रुग्णांचे सरासरी वय ५९ आहे. 'लॅन्सेट' या जागतिक स्तरावरील वैद्यकीय नियतकालिकाने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार भारतात कार्डिओव्हस्क्युलर विकारांनी होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढून २०१६ मध्ये २८ टक्के झाली.

हृदयविकाराच्या खुणा आणि लक्षणांकडे लक्ष दिलं नाही तर सर्वात जास्त हार्ट फेल्युअर होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदयाकडे वारंवार लक्ष देण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ करतात. यासोबतच लवकर निदान आणि उपचार याकडे लक्ष द्यावे. कारण यामुळेच हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी करता येऊ शकते. भारतात हार्ट फेल्युअर हा विकार होणाऱ्या रुग्णांचे सरासरी वय ५९ आहे. ‘लॅन्सेट’ या जागतिक स्तरावरील वैद्यकीय नियतकालिकाने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार भारतात कार्डिओव्हस्क्युलर विकारांनी होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढून २०१६ मध्ये २८ टक्के झाली. १९९० मध्ये ती संख्या १५ टक्क्यांवर होती. या कार्डिओव्हस्क्युलर विकारांपैकी मृत्यूला सर्वाधिक कारणीभूत ठरणारा विकार म्हणजे हार्ट फेल्युअर. या विकाराचे निदान झाल्यानंतर जवळपास २३ टक्के रुग्ण वर्षभरातच दगावतात.

हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यास होतो विकार 

जगातील एकूण इस्केमिक हृदयविकाराच्या रुग्णांपैकी जवळपास १/४ रुग्ण भारतात आहेत. हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हा विकार होतो. भारतीय रुग्णांमधील हार्ट फेल्युअरचे प्रमुख कारण इस्केमिक हृदयविकार हे आहे. पंजाब, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि त्याखालोखाल हिमाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये इस्केमिक हृदयविकाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. तज्ज्ञांच्या मते, हार्ट फेल्युअर या विकाराकडे आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नाही आणि त्यामुळे हा विकार मूकपणे आणि जलद गतीने रुग्णांचे बळी घेत आहे.

- Advertisement -

हृदयरोग हे मृत्यू होण्याचं सर्वात प्रमुख कारण आहे. हृदयाकडून होणारे रक्‍तवहन करणारे स्नायू कमकुवत झाल्याने किंवा ते कडक झाल्याने हा आजार जडतो. माझ्याकडे दर महिन्याला जे रुग्ण सल्‍ला घेण्यासाठी येतात. त्यापैकी साधारणत: १० टक्के रुग्णात या आजाराची लक्षणे दिसून येतात. इस्किमिक हृदय आजारासह अतितीव्र स्वरुपाचा मधुमेह आणि ताणतणाव यामुळेही हृदयरोगाचे रुग्ण वाढत चालले आहेत.
– डॉ. देव पहलाजानी, हृदयरोगतज्ज्ञ, ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल

ही आहेत लक्षणे

श्‍वास घेताना दम लागणे, थकवा येणे, कोपर दुखी, पाय किंवा ओटीपोटात दुखणे, अचानक वजन वाढणे, रात्रीच्या वेळी लघवीला जास्त होणे, अशी लक्षणं आढळली, तर अशांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. अशी लक्षणे केवळ उतारवयातच दिसून येतात असे नाही. तसेच, ती इतर कुठल्याही आजारांतही दिसत नाहीत. अशी लक्षणं आढळल्या तातडीने डॉक्टरांचा सल्‍ला घेणे आवश्यक आहे.

- Advertisement -

भारतातील हार्ट फेल्युअरचे प्रमाण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर वाढत असल्याने या विकाराकडे सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. बऱ्याचदा रुग्ण जेव्हा पुढे गेलेली लक्षणे घेऊन रुग्णालयात दाखल होतात किंवा त्यांना हार्ट फेल्युअरशी संबंधित असा दुसरा एखादा हृदयविकार होतो, तेव्हा या विकाराचे निदान होते. त्यामुळे, हार्ट फेल्युअरच्या लक्षणांबद्दल जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तातडीने उपाय करण्याची गरज आहे.
– डॉ. के. सरत चंद्र, अध्यक्ष, कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया

हार्ट फेल्युअर समजून घेणे महत्त्वाचे

हार्ट फेल्युअर या नावामुळे याचा अर्थ हृदयक्रिया बंद पडणे असा वाटत असलं, तरी तो तसा नाही. याचा अर्थ हृदयाचे स्नायू कमकुवत झाले असून ते व्यक्तीच्या शरीराच्या ऑक्सिजन आणि पोषणात्मक मागण्या पूर्ण करण्याइतपत रक्ताचे पंपिंग करू शकत नाहीत.

हार्ट फेल्युअरचा इशारा

कुटुंबात इस्केमिक हृदयविकारांचा इतिहास असणे, कोरोनरी आर्टरी विकार (सीएडी), हदयविकाराचा धक्का, उच्च रक्तदाब, हृदयाच्या झडपेचा आजार, कार्डिओमायोपथी, फुप्फुसांचे विकार, मधुमेह, स्थूलता, मद्य किंवा अंमली पदार्थांचे सेवन आणि एकंदर कुटुंबातील हृदयविकाराबाबतचा इतिहास यांचा हार्ट फेल्युअरमागील धोक्याच्या घटकांमध्ये समावेश होतो. श्वासोच्छवासाचा त्रास किंवा धाप लागणे, घोटे किंवा पाय वा ओटीपोटावर सूज येणे, व्यवस्थित श्वसन व्हावे, यासाठी रात्री झोपताना उंच उशी घेण्याची गरज भासणे आणि दैनंदिन कामे करताना कोणत्याही कारणाशिवाय थकवा येणे ही हार्ट फेल्युअरचा इशारा देणारी सामान्य लक्षणे आहेत.

 भारतातील हृदयविकाराची आकडेवारी 

  • भारतात ८-१० दशलक्ष हार्ट फेल्युअरचे रुग्ण असल्याचा अंदाज आहे
  • हार्ट फेल्युअरच्या रुग्णांपैकी २३% निदान झाल्यानंतर एक वर्षाच्या आत दगावतात
  • भारतातील १/३ हार्ट फेल्युअरचे रुग्ण रुग्णालयात उपचार सुरू असताना सहा महिन्यांच्या आत मरण पावतात
  • भारतीय रुग्णांमधील हार्ट फेल्युअरमागील प्रमुख कारण इस्केमिक हृदयविकार
Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -