घरमुंबईपार्ल्यात परांजपे आईमुलीची आत्महत्या

पार्ल्यात परांजपे आईमुलीची आत्महत्या

Subscribe

आयुष्याला कंटाळून हे कृत्य केल्याचा संशय

विलेपार्ले येथे एकाकी जीवन जगणार्‍या एका 72 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेने तिच्या 53 वर्षांच्या अविवाहीत मुलीसोबत घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. मीरा माधव परांपजे आणि त्यांची मुलगी मंजिरी माधव परांपजे अशी आत्महत्या करणार्‍यांची नावे आहेत. आयुष्याला कंटाळून या दोघींनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी दोन स्वतंत्र अपमृत्यूची नोंद केली असून त्यांच्या नातेवाईकांची जबानी नोंदविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना बुधवारी साडेनऊ वाजता विलेपार्ले येथील महात्मा गांधी रोड, प्रितम हॉटेलसमोरील परांपजे बंगलोजमध्ये उघडकीस आली. याच बंगल्यात मीरा पंरापजे या त्यांची अविवाहीत मुलगी मंजिरीसोबत राहत होत्या. त्यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. परांपजे बिल्डर्स ग्रुपच्या त्या दोघीही सदस्या आहेत. त्यांचा मुलगा सध्या विदेशात वास्तव्यास आहे. मीरा या काही वर्षांपासून आजारी होत्या तर मंजिरी या मानसिक रुग्ण होत्या. त्यांची देखभाल करण्यासाठी एका महिलेला त्यांच्याकडे केअरटेकर म्हणून ठेवण्यात आले होते. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता ही महिला बंगल्यातआली. तिने डोअर बेल वाजविली. मात्र आतून कोणीच प्रतिसाद दिला नाही. फोन केल्यानंतरही तिचा कॉल कोणी घेतला नाही. त्यामुळे तिने त्यांच्या नातेवाईकांना ही माहिती दिली होती. मात्र त्यांचेही कॉल त्यांनी घेतले नाही.

- Advertisement -

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली होती. ही माहिती मिळताच विलेपार्ले पोलिसांच्या एका विशेष पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. बंगल्यात प्रवेश केल्यानंतर पोलिसांना मीरा आणि मंजिरी पंराजपे यांनी घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. या दोघींना पोलिसांनी कूपर रुग्णालयात दाखल केले, मात्र तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या दोघींनी रात्री उशिराच घरात आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या आत्महत्येमागील अधिकृत कारण समजू शकले नाही.

मीरा या आजारी होत्या तर मंजिरी ही मानसिक रुग्ण होती, त्या दोघींही आयुष्याला कंटाळून गेल्या होत्या. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. लवकरच त्यांच्या नातेवाईकांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. अमेरिकेला राहणार्‍या त्यांच्या मुलाला ही माहिती देण्यात आली असून तो लवकरच मुंबईत येईल असे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -