घरक्रीडालक्ष्य विजयी चौकाराचे!

लक्ष्य विजयी चौकाराचे!

Subscribe

भारत-न्यूझीलंड चौथा टी-२० सामना आज

चुरशीचा झालेला तिसरा सामना जिंकत भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच टी-२० मालिका विजयाची नोंद केली. तिसर्‍या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर सुपर ओव्हरमध्ये मात केली. सुपर ओव्हरमध्ये अखेरच्या दोन चेंडूंवर १० धावांची आवश्यकता असताना रोहित शर्माने सलग दोन षटकार लगावत भारताला सामना जिंकवून दिला. त्यामुळे भारताने दोन सामने शिल्लक असतानाच ही मालिका आपल्या खिशात घातली. आता शुक्रवारी होणार्‍या चौथ्या टी-२० सामन्यात राखीव खेळाडूंना संधी मिळू शकेल. मात्र, संघात प्रयोग करतानाच सामने जिंकणेही महत्त्वाचे आहे, असे भारताचा कर्णधार विराट कोहली आधीच म्हणाला आहे. त्यामुळे वेलिंग्टनला होणारा चौथा सामना जिंकण्याचे भारताचे लक्ष्य असेल.

या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी झाला. तर चौथा सामना शुक्रवारी वेलिंग्टनला आणि अखेरचा सामना रविवारी माऊंट माउंगानुईला होणार आहे. दोन सामन्यांमध्ये केवळ एका-एका दिवसाचे अंतर असल्याने दोन्ही संघांना नेट्समध्ये सराव करण्यासाठी वेळ मिळालेला नाही. त्यातच सततच्या सामन्यांमुळे खेळाडूंना थकवा जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळेच अखेरच्या दोन सामन्यांत दोन्ही संघ राखीव खेळाडूंना संधी देऊ शकतील.

- Advertisement -

भारताच्या लोकेश राहुलने सलामीवीर आणि यष्टीरक्षक म्हणून आपली भूमिका चोख पार पाडली आहे. मात्र, तो यष्टिरक्षण करत असल्याने पहिल्या तीन सामन्यांत रिषभ पंत आणि संजू सॅमसन यांना संघाबाहेर बसावे लागले. परंतु, आता राहुल आणि आणखी एखाद्या फलंदाजाला विश्रांती देऊन या दोघांचा समावेश करण्याबाबत भारतीय संघ व्यवस्थापन विचार करू शकेल. त्यातच टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने सामने खेळणार असल्याने रोहित आणि कोहली यांनाही विश्रांती मिळू शकेल.

गोलंदाजांमध्ये लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या जागी ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर किंवा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव यांच्यापैकी एकाचा, तर शार्दूल ठाकूरच्या जागी नवदीप सैनीचा संघात समावेश होऊ शकेल. भारतामध्ये झालेल्या मागील काही सामन्यांत सुंदरने भारताच्या गोलंदाजीची सुरुवात केली होती. न्यूझीलंडमध्ये फिरकीपटूंना फारशी मदत मिळत नसल्याने भारताने केवळ एकाच फिरकीपटूसह (चहल) मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आणि सुंदरला संघाबाहेर बसावे लागले. परंतु, अखेरच्या दोन सामन्यांसाठी त्याने संघात पुनरागमन होऊ शकेल. दुसरीकडे अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोम अखेरच्या दोन सामन्यांसाठी न्यूझीलंड संघाचा भाग नाही. त्याच्या जागी टॉम ब्रूससारख्या नवख्या खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

प्रतिस्पर्धी संघ –                                                                                                                  भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), मनीष पांडे, शिवम दुबे, रविंद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन.

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगलायन, कॉलिन मुनरो, टॉम ब्रूस, डॅरेल मिचेल, मिचेल सँटनर, टीम सायफर्ट (यष्टीरक्षक), हमिश बॅनेट, ईश सोधी, टीम साऊथी, ब्लेअर टिकनर.

सामन्याची वेळ : दुपारी १२.३० पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -