घरमुंबईMumbai Metro-Mono : मेट्रो, मोनोला महिन्याला कोट्यवधीचा तोटा; काय आहे कारण?

Mumbai Metro-Mono : मेट्रो, मोनोला महिन्याला कोट्यवधीचा तोटा; काय आहे कारण?

Subscribe

Mumbai Metro-Mono : मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून (MMRDA) चालविल्या जाणाऱ्या मेट्रो (Metro) व मोनो रेल (Mono Rail) मार्गिकेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे दर महिन्याला 67 कोटी रुपये सहन करावा लागत आहे. धक्कादायक बाब अशी की, मार्चअखेरीस मेट्रोचा वार्षिक तोटा 281 कोटी रुपये व मोनो रेलचा वार्षिक तोटा 242 कोटी रुपये इतका होता. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात मेट्रो आणि मोनो रेलच्या तोट्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. (Mumbai Metro Mono losing crores a month What is the reason)

एमएमआरडीएकडून मुंबई महानगर क्षेत्रात पायाभूत सुविधांचे जाळे विणले जात आहे. यात रस्ते, पूल उभारणीसह मेट्रो रेल्वे उभारणीच्या कामांचा समावेश आहे. 2014 रोजी वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या 19.54 किमी मोनोरेल  सुरू झाली. यानंतर 2022 रोजी अंधेरी पश्चिम ते गुंदवली मार्गे दहिसर मेट्रो 2 अ आणि 2023 रोजी मेट्रो 7 या संयुक्त मार्गिका दोन टप्प्यांत सुरू झाल्या. मोनो रेलसाठी जवळपास 2460 कोटी रुपये खर्च करण्यात आले तर, मेट्रो 2 आणि मेट्रो 7 या मेट्रोसाठी तब्बल 12 हजार 500 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, या तिन्ही मार्गिक आज भीषण तोट्यात असल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – रामदास कदम यांना हटवा अन्यथा…, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदाधिकाऱ्यांचा इशारा

मोनो रेले सर्वाधिक तोट्यात 

मोनो रेलला 2022-23 या आर्थिक वर्षात 31 मार्च अखेरीस तब्बल 242 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. या संपूर्ण वर्षात प्रकल्पाला फक्त 13.41 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. असे असतानाही आता मार्गिकेसाठी 580 कोटी रुपयांच्या नवीन गाड्यांच्या खरेदीचा प्रस्ताव आहे. ही खरेदी भांडवली खर्चातील आहे. त्यामुळे भांडवली खर्च ग्राह्य धरल्यास कंपनीचा तोटा 520 कोटी रुपयांच्या घरात जाणार आहे, म्हणजे दरमहा कंपनीला 44 कोटी रुपयांपर्यंत  तोटा होणार आहे.

- Advertisement -

नवीन गाड्यांना तात्पुरती स्थगिती

मोनो रेल भीषण तोट्यात असल्याने दहा नवीन गाड्यांच्या खरेदीला एमएमआरडीएकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण या नवीन गाड्यांवर होणाऱ्या भांडवली खर्चामुळे 2023-24 या आर्थिक वर्षात मोनो रेलचा तोटा दुप्पट होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे.

हेही वाचा – Ratan Tata : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून गौरव

मेट्रोलाही दरमहा 23 कोटी रुपयांचा तोटा

मोनो रेल प्रमाणेच 2022-23 या आर्थिक वर्षात 31 मार्च अखेरीस मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 या मार्गिकांना 281 कोटी रुपये तोटा झाला आहे. चालू आर्थिक वर्षात या मार्गिकांचा मासिक खर्च अंदाजित 42 कोटी रुपये आहे. परंतु त्या तुलनेत मिळणारा मासिक महसूल फक्त 19 कोटी रुपये आहे. त्यामुळे दरमहा किमान 23 कोटी रुपयांचा तोटा या मार्गिकांना सहन करावा लागत आहे.

नवीन महसुली मॉडेलसाठी एमएमआरडीएकडून काम सुरू

एमएमआरडीएकडून मोनो, मेट्रो मार्गिकांना होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी नवीन महसुली मॉडेलवर काम सुरू आहे. मार्गिका तोट्यात असल्यास त्यावर काय उपाययोजना करता येतील यासंबंधी एमएमआरडीएकडून अभ्यास सुरू आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन महिन्यांत तोट्यात असलेल्या मार्गिकांसाठी नवीन महसुली मॉडेल निश्चित केले जाईल, अशी माहिती एमएमआरडीएतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -