घरमुंबईयंदाच्या पावसाळ्यातही मुंबईची परीक्षा

यंदाच्या पावसाळ्यातही मुंबईची परीक्षा

Subscribe

मुंबईत पावसाळ्याला सुरुवात झाल्याने महापालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. नागरिकांना त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेतली आहे. दरवर्षीच्या अनुभवातून बोध घेत महापालिका पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. कधी पाणी तुंबणे, तर कधी झाडे उन्मळून पडणे, तर कधी दरड कोसळणे तर कधी इमारत पडून दुर्घटना होणे अशा घटना घडतच असतात. परंतु या घटनांचा विचार करत आपत्कालीन यंत्रणा राबवणार्‍या महापालिकेसमोर कधी गटाराचा अथवा मॅनहोल्सचे झाकण निखळून गेल्यामुळे अपघात होणे तर कधी खड्डयात दुचाकी अडकून अपघात होणे अशाही घटनांची वाढ होवू लागली आहे. या आपत्कालीन घटनांशिवाय पावसाळ्यात निर्माण होणारे विविध साथीचे आजार या सर्वांचे योग्य नियोजन करत महापालिका मुंबईकरांचे जीवन सुकर करण्याण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यामुळे पुढील चार महिने महापालिकेसाठी परीक्षेचे असून महापालिकेसह विविध प्राधिकरण आणि संस्थांनी पावसाळ्यासाठी काय तयारी केली आहे याचा हा घेतलेला हा आढावा.

पाण्याचा उपसा करण्यासाठी ३२२ पंप
मुंबईतील मिठी नदीसह छोट्या, मोठ्या नाल्यांच्या रस्त्यालगत पेटीका नाल्यांची पावसाळ्यापूर्वी ७० टक्केे सफाई करणे आवश्यक असते. त्यामुळे कंत्राटदारांनी पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईचे कामे ९९ टक्केे पूर्ण केले आहे. नालेसफाईचे काम झाले असले तरीही अनेक सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे एकूण ३२२ पाणी उपसा करणारे पंप बसवण्यात येणार आहे. मुंबईत एकूण २२५ सखल भागांमध्ये पावसाचे पाणी तुंबले जायचे. परंतु पाणी तुंबण्याच्या या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिनी टाकून तसेच अन्य प्रकारची उपाययोजना करत हे भाग कमी केले. तरीही मुंबईत सुमारे १२० भागांमध्ये पाणी तुंबण्याची भीती कायम आहे.

- Advertisement -

नालेसफाई व खड्डयांच्या कामांसाठी अ‍ॅपची निर्मिती
मुंबईतील नालेसफाईसह खड्डयांच्या तक्रारींचे निवारण त्वरीत व्हावे आणि नागरिकांना आपली तक्रार त्वरीत नोंदवता यावी यासाठी महापालिकेच्यावतीने अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.यामध्ये विभागातील नालेसफाईचे काम झाले नसल्यास अथवा रस्त्यांवर खड्डा असल्यास नागरिकांना अ‍ॅपवर त्याचे छायाचित्र अपलोड करता येईल. जेणेकरून २४ तासांमध्ये त्या तक्रारींचे निवारण करता येणार आहे.

२९० ठिकाणी दरडींची भीती
मुंबईतील शहर आणि उपनगरांत दरडीची एकूण २९० ठिकाणे आहेत. डोंगराच्या पायथ्याशी तसेच त्या भागांमध्ये वसलेल्या वस्त्यांमध्ये पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती लक्षात घेता महापालिकेच्यावतीने सर्व विभागांमध्ये धोक्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना स्थलांतरीत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

४९९ इमारती धोकादायक
मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेमध्ये अतिधोकादायक या सी-१ प्रवर्गातील एकूण ४९९ इमारती आढळून आल्या आहेत. या इमारतींना पालिका अधिनियमाच्या कलम- ३५४ नुसार नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. इमारती पाडताना किंवा रिकाम्या करताना रहिवाशांनी अडथळा निर्माण केल्यास त्या इमारतीची विद्युतजोडणी व जलजोडणी खंडीत करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. तसेच स्थानिक पोलिसांची मदतदेखील घेतली जाणार आहे. आतापर्यंत १५९ इमारतींची वीज व पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

महापालिका आपत्कालीन नियंत्रण कक्षही सज्ज
मुंबई महापालिकेचा मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष हा राज्यातील प्रमुख कक्ष बनत चालला आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षाचेही एक पाऊल पुढे टाकत ऑन ड्युटी २४ सेवेत असणार्‍या या मुख्य नियंत्रण कक्षाला महापालिकेची २४ विभाग कार्यालये, ६ मोठी हॉस्पिटले, तसेच २२ बाह्य यंत्रणांना जोडणार्‍या ५२ हॉटलाईन्सद्वारे कायम संपर्कात असतात. आणीबाणीच्या प्रसंगी महापालिका आयुक्त, सर्व अतिरिक्त आयुक्त, परिमंडळीय उपायुक्त व विभागीय सहायक आयुक्त यांच्यातील संदेशवहन सुलभ व्हावे यासाठी अतिमहत्वाच्या ५३ ठिकाणांसह संबंधित वरिष्ठांच्या अधिकार्‍यांमध्ये बिनतारी संदेश (व्हिएचएफ) यंत्रणा बसवण्यात आली आहे. याशिवाय १९१६ क्रमांकाच्या ३० लाईन्स हंटींग सुविधाही उपलब्ध आहे.

मुंबईतील ५२५८ कॅमेरांवर नजर
मुंबईतील सर्व प्रकारच्या घटनांवर लक्ष ठेवता यावे यासाठी मुंबई पोलिसांच्यावतीने मुंबईत ५२५८ सी.सी.टिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे. यासर्व कॅमेरांवर महापालिकेच्या मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवले जाते. या कॅमेरांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षात व्हीडीओ वॉल बसवण्यात आली आहे. या वॉलवर द्वारे सर्व सी.सी.टिव्ही कॅमेरांमधील टिपलेल्या छायाचित्रण पाहून त्यांचे अवलोकन केले जाते.

२४ ठिकाणी विभागीय नियंत्रण कक्ष
महापालिकेच्या मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्येही नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षात स्वतंत्र मनुष्यबळ असून या कक्षात बिनतारी यंत्रणा व ४ हॉटलाईन सुरु करण्यात आल्या आहेत. या हॉटलाईनद्वारे मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष, परिमंडळ सहायक पोलीस आयुक्त, स्थानिक अग्निशमन दल व शहर आपत्ती व्यवस्थापन संस्थेतील पर्यायी नियंत्रण कक्षाशी त्वरीत संपर्क साधता येईल. प्रत्येक कक्षात तीन सत्रांमध्ये तीन याप्रमाणे २४ कक्षात ७२ आणि पर्यायी स्वरुपातील १२ कर्मचारी अशाप्रकारे ८४ नियंत्रण कक्ष चालकांची नेमणूक कंत्राटी पध्दतीने करण्यात आली आहे.

झाडे उन्मळून पडल्यास
मान्सूनमध्ये मोठ्या प्रमाणात झाड किंवा झाडाच्या फांद्या पडून दुर्घटना होत असतात. त्यामुळे अशाप्रकारची घटना घडल्यास त्यावर त्वरीत कार्यवाही करता यावी म्हणून विभाग कार्यालयांमध्ये तीन सत्रांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे कनिष्ठ वृक्ष अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे २४ तासांमध्ये याचे समन्वय राखणे शक्य होईल. तसेच विभाग कार्यालयांच्या हद्दींमध्ये पडलेली झाडे कापणे व उचलणे यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे.

आपत्ती प्रसंगी तात्पुरता निवारा
वाहतूक व्यवस्था कोलमडून विविध रेल्वे स्थानकांवर अडकून प्रवाशांचे हाल होतात. तसेच बर्‍याच वेळा दरड किंवा अन्य आपत्तीमुळे लोकांवर बेघर होण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत नागरिकांना तात्पुरते निवास मिळावा, यासाठी महापालिकेच्यावतीने १३४ शाळा आणीबाणीत एकत्रित जमवण्याची ठिकाणे म्हणून घोषित केली आहेत.

जीवरक्षक तराफे
मुसळधार पावसामुळे शहर व उपनगरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवता यावे यासाठी एकूण २०जीवरक्षक तराफे उपलब्ध करून दिलेआहेत. मुंबईतील काही विभागांची भौगोलिक परिस्थिती व पूर परिस्थिती लक्षात घेता ग्रँटरोड, परळ, शिवडी, प्रभादेवी, वरळी, लोअरपरळ, अंधेरी जोगेश्वरी पूर्व, विलेपार्ले, अंधेरी जोगेश्वरी पश्चिम परिसर, कुर्ला, विद्याविहार,चेंबूर, मालाड, गोरेगाव, कांदिवली, भांडुप,कांजूरमार्ग, पवई, मुलुंड आदी भागांमध्ये हे जीवरक्षक तराफे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ट्विटरद्वारे महापालिकेकडून दखल
मुंबई महापालिकेने यंदाच्या पावसाळ्यापासून जनतेला माहिती देण्यासाठी आणि जनतेला आपल्या विभागातील समस्या मांडण्यासाठी ट्विटर अकाऊंट्स उपलब्ध करून दिले आहे. यापूर्वी महापालिकेच्या मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्यावतीने सुरु असलेल्या ट्विटर अकाऊंट्समध्ये सुधारणा करत त्याचे नामकरण केले आहे. त्याद्वारे २४ विभागाचे इमारत देखभाल विभागाच्या अखत्यारितील एका अधिकार्‍याची समन्वयक अधिकारी अर्थात नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. या अधिकार्‍यांमार्फत महापालिकेची विकासकामे तसेच विभागातील समस्यांबाबतच्या सूचना नागरिकांना केलया जातील. तसेच या ट्विटर अकाऊंट्सवर लोकांच्या तक्रारी आल्यास त्यांचेही निराकरण संबंधित खाते किंवा विभाग कार्यालयातील नियुक्त नोडल ऑफिसर करतील.

समु्द्र किनार्‍यांवर जीवरक्षकांसह जवान सज्ज
पावसाळ्यात मोठ्या उंचीच्या भरतीच्या येणार्‍या लाटा तसेच शनिवारी, रविवारी तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी नागरिक समुद्रात आनंद लुटण्यास येत असतात. त्यामुळे समुद्रात बुडण्याची दुर्देवी घटना घडू नये म्हणून ६ समुद्रकिनार्‍यांवर महापालिकेच्या जीवरक्षकांसह कंत्राटी जीवरक्षक, तसेच एनडीआरएफच्या धर्तीवर तयार करण्यात आलेली महापालिकेच्या सुरक्षा जवानांचे पथक, पोलिस यांना तैनात करून त्यांची गस्त वाढवली जाणार आहे.

पश्चिम रेल्वेचीही सी.सी.टिव्हीद्वारे तुंबणार्‍या पाण्यावर व गर्दीवर नजर
पावसाळयासाठी पश्चिम रेल्वेही सज्ज झाली आहे. पावसाळ्यात उपनगरीय रेल्वेसेवेत कोणताही प्रकारच्या अडथळा येवू नये याची विशेष काळजी प्रशासनाच्यावतीने घेतली जात आहे. यासाठी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पश्चिम रेल्वेवरील सर्व उपनगरीय स्थानकांवर २५०० सी.सी.टिव्ही कॅमेरांच्या माध्यमातून २४ तास लक्ष ठेवण्यात येणार आहे. गर्दीच्या व्यवस्थापनासाठी रेल्वे स्थानकांवर अधिक मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा पोलिस आणि रेल्वे कर्मचार्‍यांचीही मदत घेतली जाईल. विशेष म्हणजे ग्रँट रोड ते लोअर परळ आणि वसई-विरार भागातील रेल्वे रुळांवर पाणी साचण्याचे प्रकार होत असतात, त्यावरही मार्ग काढण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहेत.

महापालिका आरोग्य विभाग
मुंबईत दरवर्षीप्रमाणेच महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने पावसाळ्यात उद्भवणार्‍या साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जनजागृतीसह विशेष कक्ष आणि कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे आदींचे कार्यक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत काही भागांमधील अनेक वस्त्यांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी तुंबले जाते. या तुंबलेल्या पाण्यामुळे मलेरिया व डेंग्यूच्या आजारांचा प्रार्दुभाव करणार्‍या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे यासाठी आधीपासून छपरावरील पन्नळ, तसेच टायर, करवंट्या, बॉटल्स तसेच प्लास्टिक साहित्य नष्ट करण्यात आले होते. यासाठी महापालिकेच्या प्रमुख हॉस्पिटलांसह उपनगरीय हॉस्पिटलांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी केईएम, शीव आणि नायर हॉस्पिटलांमध्ये वैद्यकीय व निम वैद्यकीय कर्मचार्‍यांना मागील दोन महिन्यांपासून प्रशिक्षण देण्यात आले आहे. पावसाळ्यात डोके वर काढणार्‍या साथीच्याआजारांवर कशाप्रकारे काम करायची तसेच रुग्णांवर कशाप्रकारे उपचार करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

साथीच्या आजार पावसाळ्यात उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्यातीने दक्षता घेतली जात आहे. यासाठी वस्त्यावस्त्यांमध्ये जावून महापालिकेच्यावतीने जागरुकता कार्यक्रम राबवले जात आहे. महापालिकेच्या प्रमुख हॉस्पिटलांसह उपनगरीय हॉस्पिटलांमध्ये साथरोग आजारांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या घरांमध्ये तसेच आसपास सात दिवसांपेक्षा अधिक पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी. यामुळेच डेंग्यू, मलेरियासारखे साथीच आजार बळावतात, असे आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केले आहे. साथीच्या आजारांच्या दृष्टीकोनातून हॉस्पिटलांमध्ये औषधांचा साठा पुरेसा असलयाचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -