घरमुंबईपुस्तकांची सफर घडवणारे लायब्ररी सायन्स

पुस्तकांची सफर घडवणारे लायब्ररी सायन्स

Subscribe

आपलं करिअर

‘वाचाल तर वाचाल’ असे आपण नेहमी म्हणतो. म्हणजेच वाचन केले तरच मानवाचे कल्याण आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वाचन हा सुखद आनंद देणारा क्षण असतो. जगातील अनेक महान व्यक्तिमत्वे वाचनाने घडल्याचे आपण नेहमी एकतो. तसेच त्यांचा स्वानुभवही हेच सांगतो. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात तंत्रज्ञानाचा शोध लागला तरी पुस्तकांचे महत्त्व कमी झालेले नाही. जगभरात अनेक दुर्मीळ ग्रंथालये आणि पुस्तके वाचकांच्या दिमतीला उभी आहेत. इंटरनेटच्या युगात ई-पुस्तके संगणकावर आली तरी ग्रंथालयात जाऊन वाचणार्‍यांची संख्या कमी नाही.

अचूक संदर्भ शोधण्यासाठी ग्रंथालयाशिवाय पर्याय नसतो. लाखो पुस्तकांच्या गराड्यातून ग्रंथपाल आपल्याला हवे ते पुस्तक अचूक शोधून देतो. ग्रंथ वर्गीकरण, तालिकीकरण अशा विविध संकल्पनांचा अंतर्भाव असलेले शास्त्र म्हणजेच ग्रंथालय. शास्त्र अर्थात ते ही एक उत्तम व्यवस्थापन असते. यासाठी ग्रंथपालास त्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. एकंदरीत ग्रंथालय हा माहितीचा सर्वात मोठा स्त्रोत असून ग्रंथपालन विषयात रस असणार्‍यांसाठी हा करिअरचा एक उत्तम पर्याय होऊ शकतो. ग्रंथपालाचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रमापासून ते विद्यावाचस्पती (पी.एच.डी.) पर्यंतचे अभ्यासक्रम विविध महाविद्यालये व विद्यापीठांद्वारे शिकविले जातात.

- Advertisement -

1. सी. लिब. (सर्टिफिकेट इन लायब्रेरियनशिप) हा तीन महिने कालावधीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्राद्वारे विक्रोळी, बदलापूर इत्यादी ठिकाणी चालविण्यात येतो. शालेय ग्रंथपाल पदासाठी हा शासनमान्य अभ्यासक्रम ग्राह्य धरण्यात येतो. तसेच महाविद्यालय व विद्यापीठ ग्रंथालयांमध्ये ग्रंथालय परिचारक या पदासाठी सी.लिब. उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येते.
शैक्षणिक पात्रता : किमान 10 वी उत्तीर्ण व त्यापुढील शैक्षणिक पात्रता

2. बी.लिब.आय.एस.सी. (बॅचलर इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स) हा पदवी अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचा असून हा काही महाविद्यालये व विद्यापीठांद्वारे चालविण्यात येतो.
शैक्षणिक पात्रता: कुठल्याही शाखेची पदवी ही किमान शैक्षणिक पात्रता आहे.

- Advertisement -

3. एम.लिब.आय.एस.सी. (मास्टर इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स) हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचा असून हा काही महाविद्यालये व विद्यापीठांद्वारे चालविण्यात येतो.
शैक्षणिक पात्रता: बी.लिब.आय.एस.सी. ही ग्रंथालय व महितीशास्त्रातील पदवी उत्तीर्ण असणे ही किमान शैक्षणिक पात्रता आहे.

4. एम. फील. व पी.एच.डी. या उच्च शिक्षणातील अत्युच्च पदव्याही ग्रंथालय आणि महितीशास्त्र विषयात उपलब्ध आहेत.
शैक्षणिक पात्रता : एम.लिब.आय.एस.सी. हा ग्रंथालय व महितीशास्त्रातील पदवी उत्तीर्ण असणे ही किमान शैक्षणिक पात्रता आहे.

यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्रवेशपूर्व परीक्षा द्यावी लागते. नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार कुठल्याही शाखेच्या पदवीनंतर दोन वर्षांचा एम.लिब.आय.एस.सी हा अभ्यासक्र उपलब्ध आहे.

प्रशिक्षण संस्था
मुंबई विद्यापीठ, मुंबई
जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे
एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ, मुंबई
टाटा सामाजिक संस्था, मुंबई (टीआयएसएस)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
शिवाजी विद्यापीठ विद्यानगर, कोल्हापूर
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

नोकरीच्या संधी
महाविद्यालये, शाळा, सार्वजनिक ग्रंथालयात ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल पदासाठी पदे उपलब्ध असतात. राष्ट्रीय पात्रता चाचणी किंवा राज्यस्तरीय पात्रता चाचणी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच महाविद्यालय ग्रंथपाल व विद्यापीठ ग्रंथालयामध्ये सहाय्यक ग्रंथपाल पदासाठी नियुक्ती होते. शासकीय महाविद्यालयांमध्ये एमपीएससीद्वारे महाविद्यालये ग्रंथपालांची पदे भरण्यात येतात. तसेच स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे सुद्धा ग्रंथपाल पदे विविध केंद्र सरकारी कार्यालयात भरण्यात येतात. विद्यापीठातील ग्रंथालयात वरिष्ठ ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, उपग्रंथपाल त्याचप्रमाणे शासकीय ग्रंथालये, वस्तुसंग्रहालये, सरकारी ग्रंथालय, विद्यापीठ, बँका, सार्वजनिक संस्था, न्यायालये, वृत्तपत्र प्रकाशन संस्था, खासगी संस्था, विविध संशोधन व विकास संस्था, संशोधन प्रयोगशाळा (उदा. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र पुणे) इत्यादी क्षेत्रांमध्ये वाव मिळतो. तसेच सरकारी संस्था, संघटना, संग्रहालये, कंपन्या, विधि सल्लागार कंपन्या, वैद्यकीय केंद्रे, धार्मिक संघटना आदी ठिकाणी.

बदलत्या युगामध्ये ग्रंथालय संगणकीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही प्रगत अभ्यासक्रमही पूर्ण करणे आवश्यक आहे.

1. एम.एस. इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम डी.आर.टी.सी. इंडियन स्टाटीस्टिकल इन्स्टिट्यूट, बंगळुरू शैक्षणिक पात्रता: कुठल्याही शाखेची पदवी ही किमान शैक्षणिक पात्रता आहे.

2. सी.एस.आय.आर. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन रिसोर्सेस या दिल्लीस्थित संस्थेतही ग्रंथालय संगणकीकरणाचे प्रगत अभ्यासक्रम चालविले जातात.

3. ‘स्वयम’: विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ‘यूजीसी’तर्फे ‘स्वयम’च्या (स्टडी वेब्ज ऑफ अ‍ॅक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अ‍ॅस्पायरिंग माईन्ड्स) रूपाने संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘स्वयम’च्या माध्यमातून संचालित ‘मूक’ (मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस) अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त साधन आहे. याद्वारे ग्रंथालय व माहितीशास्त्रातील विविध अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकविले जातात.

– प्रा. उदय कुलकर्णी, ग्रंथपाल, विकास महाविद्यालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -