घरमुंबईफलकबाजीमुळे नवी मुंबईचे बकाल स्वरूप

फलकबाजीमुळे नवी मुंबईचे बकाल स्वरूप

Subscribe

मनपा आयुक्तांचे स्वच्छ भारत अभियान कागदावरच असल्याने राजकीय नेत्यांसह इतर प्राधिकरणांनी अस्वच्छ भारत अभियानाला गती दिली आहे. त्यामुळे जानेवारीत येणार्‍या केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान पथकाची नजर कोणावर पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शासनाचा जमिनी संदर्भात निर्णय,वचनपूर्ती सोहळा, रस्ते आणि गटाराची कामे, यामुळे रस्ते खोदून ठेवले आहेत. तर चौकात फलकबाजी दिसत आहे. दुसरीकडे रेल्वे स्थानके अतिक्रमण व घाणीच्या विळख्यात अडकली असून संपूर्ण शहर विद्रूप झाले आहे.यावर अत्यंत कमी कालावधीत मनपा आयुक्त नियंत्रण मिळवणार कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पालिका गेली चार वर्षे स्वच्छ भारत अभियानात अव्वल येण्यासाठी जंगजंग पछाडत आहे. मात्र, शहरातील बेकायदेशीर फलकबाजी आणि खोदकामांनी या अभियानात ‘खो’ घातला आहे. विशेष म्हणजे स्वच्छ भारत अभियानासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणारी महापालिका या विद्रुपीकरणाला आळा घालण्यास अपयशी ठरली आहे. सध्या नाताळ, नवीन वर्ष, जयंती, पुण्यतिथी आणि श्रेयवादाच्या फलकबाजीचे सर्वत्र पेव फुटले आहे. यावर प्रशासन अधिकारी कार्यतत्पर नसल्याने एकट्या मनपा आयुक्तांची येत्या स्वच्छ भारत अभियानात अग्निपरीक्षा आहे.

- Advertisement -

दोन वर्षांपूर्वी नवी मुंबई पालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या दहा महिन्यांच्या काळात शहरात एकही बेकायदेशीर फलक दिसून आढळून आला नाही. परवानगी घेऊन फलक लावणार्‍यांची संख्याही बोटावर मोजण्याइतकी होती. त्यांची बदली होताच पुन्हा नियमबाह्य प्रसिध्दीला उधाण आले आहे. शहरात फलक लावण्याची परवानगी देण्याचे सर्वाधिकार त्या-त्या प्रभाग अधिकार्‍यांना देण्यात आलेले आहेत. मात्र, ही बेकायदेशीर फलकबाजी रोखण्यात हे प्रभाग अधिकारी अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

परवानगी घेऊन फलक लावणारे दोन फलकांची रीतसर परवानगी घेतात आणि त्यामागे वीस फलक लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नवी मुंबईत सध्या अनेक नियुक्त्या, सण-समारंभ आणि सोहळे पार पडत आहेत. त्यात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागल्याने सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांना इच्छुक उमेदवारांना सक्रिय केले आहे. त्यासाठी त्यांना कार्यक्रम घेण्यास भाग पाडले जात असून लागणारी आर्थिक रसद पुरवली जात आहे. या कार्यक्रमांची जाहिरात बेकायदेशीर फलकबाजीने केली जात असून शहराच्या प्रत्येक कोपर्‍यावर हे बेकायदेशीर फलक लावले गेले आहेत.

- Advertisement -

शहराला विद्रूप करणार्‍या बेकायदेशीर फलकबाजीवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले असून दररोज सकाळी दोन तास प्रत्येक प्रभाग अधिकारी हे बेकायदेशीर फलक हटवत आहेत. सण-समारंभाच्या निमित्ताने ही बेकायदेशीर फलकबाजी ठळकपणे दिसून येते. त्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
रवींद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -