घरमुंबईशिवसेना व्हिप टाईप झाला भाजपच्या कार्यालयात

शिवसेना व्हिप टाईप झाला भाजपच्या कार्यालयात

Subscribe

लोकसभेत गेल्या शुक्रवारी नरेंद्र मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास ठरावाच्या अगोदर मित्र पक्ष शिवसेनेचा व्हिप भाजपच्या संसदीय पक्षाच्या कार्यालयात टाईप करून घेतल्याची माहिती आता उघड होत आहे.

लोकसभेत गेल्या शुक्रवारी नरेंद्र मोदी सरकारवर आणलेल्या अविश्वास ठरावाच्या अगोदर मित्र पक्ष शिवसेनेचा व्हिप भाजपच्या संसदीय पक्षाच्या कार्यालयात टाईप करून घेतल्याची माहिती आता उघड होत आहे. लोकसभेतील गटनेते आनंदराव अडसूळ आणि ज्येष्ठ खासदार गजानन किर्तीकर यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या सांगण्यावरून भाजपच्या कार्यालयात शिवसेनेचा व्हिप टाईप करून घेतला, अशी खळबळजनक माहिती एका खासदाराने नाव न छापण्याच्या अटीवर ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

खासदारांमध्ये गैरसमज

दोन वरिष्ठ खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा न करता भाजपच्या नेत्याच्या सांगण्यावरून पक्षाचे मुख्य प्रतोद खासदार चंद्रकांत खैरे यांना व्हिप काढायला भाग पाडले. त्यामुळेच अगोदर मतदानात भाग घेण्याच्या आपल्या निर्णयापासून शिवसेनेला घुमजाव करावे लागले आणि खासदारांमध्ये गैरसमज होऊन गोंधळ वाढला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तात्काळ डॅमेज कंट्रोल करत पक्षाच्या सर्व १८ खासदारांशी गुरुवारी संध्याकाळी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास संपर्क साधला आणि अविश्वास ठरावाबाबतीत अंतिम निर्णय शुक्रवारी (२० जुलै)सकाळी १० वाजता पक्षाचा निर्णय कळवला जाईल, असा आदेश दिल्याने खासदारही गोंधळले.

- Advertisement -

कार्यालयात हिंदी टंकलेखक नाही 

अविश्वासदर्शक ठरावावर पक्षाची भूमिका ठरवण्यापूर्वी सर्वच्या सर्व खासदारांना दिल्लीत उपस्थित राहण्याचा व्हिप शिवसेना खासदार आणि लोकसभेतील गटनेते आनंदराव अडसूळ आणि गजानन किर्तीकर यांनी पक्षादेश भाजपच्या कार्यालयात टाईप करून घेतला. याबाबत शिवसेनेच्या एका ज्येष्ठ खासदाराने त्या दोन्ही खासदारांना याबाबत विचारले असता त्यांनी आपल्या कार्यालयात हिंदी टंकलेखक नसल्याचे सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ट्विटरवर कायम अपटेड असणारे शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि टेक्नोसॅवी असलेले अनिल देसाई यांच्या ही गोष्ट कशी लक्षात आली नाही, असा सवाल त्या खासदाराने केला.

कॉम्प्युटरमधील पत्र आयटी सेलच्या माध्यमातून व्हायरल 

शिवसेनेच्या दिल्लीतील संसदेच्या कार्यालयात हिंदी टंकलेखक असू नये याकडे यापूर्वीही अनेक खासदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा केल्यानेच दिल्लीमध्ये शिवसेनेची छिथू झाल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेच्या सर्व खासदारांना अविश्वास ठरावाच्या वेळी हजर राहण्याबाबतचा आणि अविश्वास ठरावाच्या वेळी भाजप सरकारच्या बाजूने उभे राहण्याच्या आदेशावर मुख्य प्रतोद म्हणून चंद्रकांत खैरे यांनी सही केली खरी. मात्र शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय जाहीर करताच भाजप कार्यालयातील कॉम्प्युटरमधील पत्र आयटी सेलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपसुकच झळकले.

- Advertisement -

खोडसळपणा करून मला बदनाम करण्याचा कट

दरम्यान, भाजप कार्यालयात टाईप केलेल्या व्हिप बाबत ‘आपलं महानगर’ने खासदार गजानन किर्तीकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशा प्रकारचे कोणतेही पत्र आम्ही भाजपा कार्यालयात टाईप केले नाही.तर मुख्य प्रतोद चंद्रकांत खैरे यांनी हा कुणीतरी खोडसळपणा करून मला बदनाम करण्याचा कट आखल्याचे सांगितले. लोकसभेतील गटनेते आनंदराव अडसूळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा विषय आता संपलेला आहे. तुम्ही काय लिहीताय याच्याशी मला स्वारस्य नाही. ‘सामना’तून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेचा व्हिप आपण भाजप कार्यालयातून टाईप करून घेतला हे खरे आहे का, यावर हा आमचा अंतर्गत मामला असून तुमच्याशी चर्चा करणे मला योग्य वाटत नाही, असे म्हटले.

व्हीपबाबत सगळ्या गोष्टी आता संपलेल्या आहेत. हा सगळा आमच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न असून तुमच्याबरोबर चर्चा करणे हे महत्वाचे वाटत नाही.
आनंदराव अडसूळ, खासदार, शिवसेना

भाजपच्या नेत्यांवर किती विश्वास ठेवावा

खासदार आनंदराव अडसूळ हे लोकसभेतील गटनेते असून, पक्षाच्या भूमिकेबाबत कायम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असतात. मात्र केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं असं सांगितले. मात्र सध्याचे राजकीय वातावरण पाहता भाजपच्या नेत्यांवर किती विश्वास ठेवावा, याची चुणूकच अडसूळ आणि किर्तीकर यांना यानिमित्ताने आली असेल, असा खोचक सल्ला एका खासदाराने दिला.

आम्ही भारतीय जनतेचे मित्र – उद्धव ठाकरे

‘सरकारला मतदान करायचंच असतं तर इतके दिवस आम्ही सरकारच्या निर्णयावर हल्ला का चढवला असता? विश्वासदर्शक-अविश्वासदर्शक हा जो काही प्रकार आहे… नेमका कुणी कोणावर विश्वास आणि अविश्वास दाखवायचा? आम्ही विरोधी पक्षात जाऊन सरकारविरोधात मतदान करायचे का? विरोधी पक्षाने तरी असं काय केलं आहे? शिवसेना केंद्र आणि राज्याच्या सत्तेत सामील आहे. पण, सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम शिवसेना करतेय. आम्ही कोणत्याही एका पक्षाचे मित्र नाही, तर भारतीय जनतेचे मित्र आहोत, त्यामुळे जनतेच्या हिताच्या नसलेल्या गोष्टींना विरोध करणारच’, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी सोमवारी ‘सामना’तून मांडले. त्यामुळे शिवसेना तटस्थ का राहिली, त्यांनी चर्चेत भाग का घेतला नाही, यावरून सुरू असलेल्या चर्चेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे.
सावजाची शिकार मीच करीन, आता सावज दमलंय, त्याला बंदुकीची गरजही लागणार नाही’, अशा शब्दांत त्यांनी भाजपाला स्वबळावर पराभूत करण्याचा निर्धारच व्यक्त केलाय. शिवसेना भारतीय जनतेचा मित्र आहे. कोणत्याही एका पक्षाचा मित्र नाही. म्हणूनच वेळोवेळी एखादी गोष्ट आम्हाला पटली नाही किंवा पटणार नाही, तेव्हा आम्ही बोलतोय. आम्ही सरकारच्या एखाद्या भूमिकेला वा धोरणाला विरोध केला तो देशाच्या, जनतेच्या हितासाठीच, असाही पुनरुच्चार केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -