घरमुंबईमराठी, गुजरातींची कोटकांना पसंती

मराठी, गुजरातींची कोटकांना पसंती

Subscribe

 मानखुर्दकरांकडून अल्प प्रतिसाद

ईशान्य मुंबईमध्ये मराठी व गुजराती समाजाच्या नागरिकांची संख्या मोठी आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये मुलुंड, घाटकोपर हे गुजराती तर विक्रोळी, भांडुप, घाटकोपर पश्चिम हा भाग मराठी लोकवस्तीचा ओळखला जातो. या सर्व भागांतून कोटक यांना प्रचंड प्रमाणात मते मिळाली. मात्र मुस्लिमबहुल परिसर म्हणून ओळखला जाणार्‍या मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून कोटक यांना फारच अल्प प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेने विरोध केल्याने ईशान्य मुंबई मतदारसंघातून भाजपकडून मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र सोमय्या यांना शिवसेनेने केलेला विरोध व भाजपने दिलेले उमेदवार कोटक हे गुजराती समाजाचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेले संजय पाटील हे मराठी असल्याने या भागामध्ये मराठी-गुजराती अशी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र शिवसेनेबरोबर झालेल्या युतीचा फायदा हा मनोज कोटक यांना झाल्याचे दिसून येते. घाटकोपर पूर्व व मुलुंड या विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या भाजपच्या मतदारांनी कोटक यांना मोठ्या प्रमाणात मतदान केले. तर शिवसेनेबरोबर असलेल्या युतीमुळे विक्रोळीतील कन्नमवार नगर, टागोरनगर, पार्कसाईट या मराठीबहुल वस्तीतील तसेच भांडुप, कांजूरमार्ग येथील मराठी मते कोटक यांच्या पारड्यात पडली.

- Advertisement -

मुलुंड या भाजपच्या बालेकिल्ल्यातून कोटक यांना तब्बल 1 लाख 27 हजार 667 मते पडली तर घाटकोपर पूर्व मतदारसंघांतून त्यांना 93 हजार 369 मते तर घाटकोपर पश्चिम मतदारासंघामध्ये कोटक यांना 86 हजार 903 मते पडली. त्याचप्रमाणे मराठीबहुल मतदारसंघ असलेल्या विक्रोळी व भांडुपमध्ये कोटक यांना अनुक्रमे 70 हजार 868 व 97 हजार 361 मते पडली. संजय पाटील हे भांडुपमधील स्थानिक असूनही त्यांना कोटकच्या तुलनेत भांडुपमध्ये कमी मते पडली. पाटील यांना मुलुंडमध्ये 40 हजार 484, विक्रोळीतून 41 हजार 779, भांडुप 51 हजार 397, घाटकोपर (पश्चिम) 44 हजार 104, घाटकोपर (पूर्व) 30 हजार 231 मते मिळाली. एकीकडे कोटक यांना मतदारांनी पसंती देत भरघोस मते दिली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय पाटील यांना मानखुर्द-शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघात कोटक यांच्या तुलनेत दुप्पट मते मिळाली. कोटक यांना मानखुर्दमध्ये अवघे 35 हजार 251 तर संजय पाटील यांना 79 हजार 451 मते मिळाली.

ईशान्य मुंबईमध्ये रिपब्लिकन पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. हा वर्ग प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान करेल व त्याचा फटका संजय पाटील यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने तब्बल 67 हजार मते मिळवत आपले अस्तित्व दाखवून दिले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार निहारिका खोंदले यांना मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघातून सर्वाधिक 15 हजार 348 मते मिळाली तर त्याखालोखाल घाटकोपर (पूर्व) 13 हजार 296 व विक्रोळी 12 हजार 268, घाटकोपर (पश्चिम) 11 हजार 313 अशी मते पडली. निहारिका खोंदले यांना जरी 67 हजार मते मिळाली असली तरी त्याचा कोणताही फायदा कोटक यांच्या विजयामध्ये दिसून येत नाही. कोटक यांना मतदारांनी एकतर्फी निवडून देत तब्बल दोन लाख 26 हजार मतांनी निवडून दिले आहे.

- Advertisement -

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -