घरमनोरंजनआता ' फिल्म फेअर पुरस्कार-२०२४ ' सुद्धा गुजरातला !

आता ‘ फिल्म फेअर पुरस्कार-२०२४ ‘ सुद्धा गुजरातला !

Subscribe



भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा ‘फिल्म फेअर पुरस्कार २०२०’ चा अपवाद वगळता आजपर्यंत महाराष्ट्रात संपन्न होत आला आहे. फिल्म फेअरचं हे ६९वं वर्ष आहे. परंतु यंदाचा ‘फिल्म फेअर पुरस्कार-२०२४’ गुजरातला संपन्न होणार आहे. त्यामुळे आता फिल्म फेअरही गुजरातला गेला असा सूर उमटत आहे. काल फिल्म फेअरकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याची घोषणा करण्यात आली. हि पत्रकार परिषद जियो वर्ल्ड सेंटरमध्ये घेण्यात आली होती. त्यावेळी निर्माता करण जोहर, अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील मंडळी उपस्थित होती.
यंदा हा पुरस्कार सोहळा गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे २७ आणि २८ जानेवारी या दोन दिवसांत संपन्न होणार आहे. गुजरात टुरिजमच्या मदतीने हा सोहळा पार पडणार असून अनेक बॉलिवूड तारे- तारकांची त्याला हजेरी लागणार आहे. या सोहळ्याचं सूत्रसंचालन २००१ पासून निर्माता करण जोहरच करत आलेला आहे व यंदाच्या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्याच्यावरच सोपविण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत उपस्थितांना करण जोहर म्हणाला की, यंदाही मीच सूत्रसंचालन करीत असल्यामुळे मी आतुर आहे. संस्कृती, परंपरा, सशक्तीकरण आणि आता आर्थिक विकास असलेल्या गुजरातच्या भूमीवर जाऊन मी हा सोहळा साजरा करणार आहे. सूत्रसंचालनाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात फिल्म फेअरचा मोठा वाटा आहे. २००१ साली मला पहिल्यांदा सूत्रसंचानलन करण्याची संधी फिल्मफेअरने दिली होती. त्यामुळे मी पहिल्यांदा व्यासपीठावर आत्मविश्वासाने उभा राहिलो होतो. म्हणूनच फिल्म फेअरसोबत माझं एक वेगळं भावनिक नातं आहे.
फिल्मी सितार्यांनी ओसंडून वाहणाऱ्या फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्याबद्दल सर्वांनाच अप्रूप वाटतं. तो पाहण्यासाठी अनेक रसिक आतुर असतात. परंतु महाराष्ट्रातून आधीच काही प्रोजेक्ट्स गुजरातला गेले असल्याच्या पार्श्वभूमीवर आता हा सोहळाही मुंबईतून गुजरातला गेल्यामुळे यावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -