घरमुंबईदीड हजाराची साडी पडली ३८ हजाराला

दीड हजाराची साडी पडली ३८ हजाराला

Subscribe

ऑनलाईन शॉपिंग करणे एका गृहणीला चांगलेच महागात पडले आहे. एका ऑनलाईन साईटवरून खरेदी केलेली साडी आवडली नाही म्हणून ती परत करण्यासाठी गृहणीला चक्क ३८ हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला आहे. गुगलवर शोधलेल्या या ऑनलाईन कंपनीच्या चुकीच्या फोन क्रमांकावरून एका इसमाने या गृहणीची फसवणूक केली असून याप्रकारे अनेक जणांची फसवणूक झाली असल्याचे समोर येत आहे.

वेळ आणि पैसे वाचवण्यासाठी अनेक जण ऑनलाईन शॉपिंगच्या नादाला लागला आहे. हा ट्रेंड सध्या सर्वत्र दिसून येत असला तरी त्यातून अनेकांची फसवणूक होत असल्याचे प्रकारही सर्रास सुरू आहेत. ऑनलाईन शॉपिंगचा हा ट्रेंड बघून ऑनलाईन बाजारात नवीन ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. या कंपन्यांबरोबर फसवणूक करणारेही मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत. अशाच प्रकारची ऑनलाईन फसवणूक वरळीच्या कोळीवाड्यात राहणार्‍या ममता उमानाथ शेट्टी यांच्यासोबत झाली.

- Advertisement -

ममता यांनी काही आठवड्यांपूर्वी एका ऑनलाईन शॉपिंग साईटवरून दीड हजार रुपये किमतीची साडी विकत घेतली होती. कंपनीने ममता यांना साडी घरपोच पाठवली. ममता यांनी साडीचे पैसे रोख दिले. मात्र, त्यांनी साडीचे पार्सल उघडून बघितले असता त्यांना साडी न आवडल्यामुळे त्यांनी ती परत करण्यासाठी ‘गुगल’वर ज्या ऑनलाईनवरून साडी मागवली त्यांचा कस्टमर केअर क्रमांक शोधला. त्या क्रमांकावर फोन केला व खरेदी केलेली साडी पसंत नसल्याने साडी परत करून पैसे परत मागितले. कस्टमर केअरमधून बोलणार्‍या व्यक्तीने ममता यांच्याकडे त्यांचा एटीएम कार्डच्या शेवटी असणार्‍या सहा डिजिटची माहिती मागितली. प्रथम ममता यांनी माहिती देण्यास नकार दिला असता तुम्ही माहिती दिली नाही तर आम्ही तुमचे पैसे कसे परत करणार, असे सांगून ममता यांच्या कार्डची माहिती आणि बँक खाते क्रमांक घेतला. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या खात्यातून चार वेळा वेगवेगळी रक्कम असे एकूण ३७ हजार ९९९ रुपये काढल्याचे मेसेज ममता यांच्या मोबाईल फोनवर आले.

ऑनलाईन खरेदी पडली गृहिणीला महागात
ममता यांना घडला प्रकार लक्षात येताच त्यांनी ताबडतोब बँकेला संपर्क साधून पुढील व्यवहार थांबवले. दरम्यान, हा प्रकार त्यांनी आपल्या पतीला कळवला असता त्यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. ममता या गृहिणीने दादर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -