घरमुंबईभिवंडी - वडपे बायपास महामार्गावर ट्रक चालकाचा खून; आरोपींना अटक

भिवंडी – वडपे बायपास महामार्गावर ट्रक चालकाचा खून; आरोपींना अटक

Subscribe

मुंबई - नाशिक महामार्गावरील वडपे बायपास येथील शालीमार हॉटेलसमोर एका ट्रक चालकाचा खून करून त्याचा मृतदेह केबिनमध्ये फेकून आरोपी फरार झाले होते. त्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मुंबई – नाशिक महामार्गावरील वडपे बायपास येथील शालीमार हॉटेल समोर २६ फेब्रुवारी २०१९ रोजी एका ट्रक चालकाचा खून करून त्याचा मृतदेह केबिनमध्ये फेकून आरोपी फरार झाले होते. या घटनेत ट्रक चालक सुभाष छबिराज यादव (वय ४५, रा. परशुरामपूर, अजमगढ, उत्तर प्रदेश) याची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेनंतर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या विरोधात भादंवि. कलम ३०२, ३९६,१२० (ब), २०१ अन्वये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सबळ पुरावा नसल्याने मारेकऱ्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असताना तालुका पोलीस ठाण्याचे एपीआय पंकज घाटकर यांनी पोलीस पथकाच्या मदतीने मृत चालकाचा सहकारी चालक मोहम्मद अजमल उर्फ अकमल वसी अहमद शेख (वय ३६, रा. विकासपाडा, तलासरी) याला प्रथम ताब्यात घेतले. त्याच्याकडे शिताफीने चौकशी केली असता त्याने अन्य चार जणांच्या साथीने सुभाष यादव याची लोखंडी टॉमीने डोक्यावर तसेच तोंडावर जोरदार प्रहार करून हत्या केल्याची कबुली दिली.

संगनमताने केला चालकाचा खून 

या हत्येमध्ये मोहम्मद शाकीर रियाज अहमद शेख (वय ३०, रा. गोवंडी), मोहम्मद कैफ अहमद अल्ताफ शेख (वय ३३, रा. शांतीनगर), जहान जेब अमीन खान (वय २३, रा. गैबीनगर), मोहम्मद इमरान अलील खान (वय ३५, रा. अन्सार नगर) आदींनी संगनमताने कट रचून हत्या केली असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते. परंतू पोलिसांनी या सर्वांना अटक करून आज, रविवारी भिवंडी न्यायालयातील न्यायाधीश आर. ए. सावंत यांच्यासमोर उभे केले. न्यायाधीशांनी त्यांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यातील आरोपी चालक मोहम्मद अजमल याने साथीदारांशी संगनमत करून गुजरात येथून सिमेंट ब्लॉकने भरलेला ट्रक हा लोणावळा येथे मालाची डिलेव्हरी देण्यासाठी घेऊन जात असताना मुंबई – अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड नाका येथून ट्रकचे अपहरण करून ट्रक भिवंडी बायपास येथे घेऊन आले. मात्र त्यावेळी सिमेंट ब्लॉक चोरून विकण्यास चालक सुभाष यादव याने विरोध दर्शवला त्यामुळे त्याची डोक्यावर लोखंडी टॉमी मारून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -