घरCORONA UPDATECorona virus: तिसऱ्या लाटेसाठी ५ जंबो कोविड सेंटरची तयारी; कंत्राटदारांवर १०५ कोटींची...

Corona virus: तिसऱ्या लाटेसाठी ५ जंबो कोविड सेंटरची तयारी; कंत्राटदारांवर १०५ कोटींची खैरात

Subscribe

७४८ आयसीयू बेड, २०९९ ऑक्सिजनेटेड बेड, ८०१ नॉन ऑक्सिजनेटेड बेड

कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गांभीर्याने घेत मुंबई महापालिकेने ५ ठिकाणी जंबो कोविड सेंटर कार्यान्वित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या खासगी कंत्राटदाराकडून भाडे तत्वावर प्रचलन व व्यवस्थापन सेवा घेण्यात येणार आहे. पालिका त्याकरिता वैद्यकीय संस्थेला तब्बल १०५ कोटींची खैरात देण्यात येणार आहे.
यासंदर्भातील प्रस्तावाला विना चर्चा आणि बिनविरोध मंजुरी देण्यात आली.

गेल्या मार्च २०२० पासून मुंबईत घुसखोरी केलेल्या कोविडला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत तब्बल ५ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र आपत्कालीन बाब म्हणून स्थायी समितीने दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करून पालिका प्रशासन, संबंधित अधिकारी हे कंत्राटदारांशी संगनमत करून परस्पर कंत्राटकामे मार्गी लावली जात आहेत. मात्र त्याचे प्रस्ताव स्थायी समिती बैठकीत अगोदर मंजुरीला न आणता त्याबाबतची कामे पार पडल्यानंतर त्याचे प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीसाठी आणले जात असल्याने व त्याची सखोल माहिती दिली जात नसल्याने त्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नगरसेवकांकडून वारंवार करण्यात आले. मात्र आज कोविड जंबो सेंटर भाडे तत्वावर घेण्याबाबत १०५ कोटींचे प्रस्ताव मंजुरीला आले असता भाजपच्या एकाही नगरसेवकाने त्यास विरोध केला नाही अथवा त्याबाबत साधा छोटा प्रश्नही उपस्थित न केल्याने चर्चेला उधाण आले.

- Advertisement -

पुढील ३ महिन्यांसाठी अथवा जोपर्यंत कोविडचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत हे कंत्राटकाम खासगी वैद्यकीय संस्थेला देण्यात येणार आहे. त्यामुळे जर कोविडचा कालावधी वाढल्यास सदर खासगी वैद्यकीय संस्थेला म्हणजेच कंत्राटदारांना कोविडचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत शेकडो कोटी रुपयांचा मलिदा खायला मिळणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. त्यामुळे पालिकेतील पहारेकरी भाजपच्या नगरसेवकांकडून या प्रस्तावांना विरोध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

बीकेसी, दहिसर, मालाड, कांजूरमार्ग व सोमय्या या ठिकाणी हे ५ जंबो कोविड सेंटर कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. या ५ कोविड जंबो सेंटरच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी ७४८ आयसीयू बेड, २०९९ ऑक्सिजनेटेड बेड, ८०१ नॉन ऑक्सिजनेटेड बेड, १०० पेड्रियाटीक आयसीयू बेड, २० डायलिसिस ( आयसीयू) बेड, ४० ट्राएज ( आयसीयू) आणि १०० पेड्रियाटीक बेड उपलब्ध होणार आहेत.

- Advertisement -

महापालिका प्रशासन, प्रति आयसीयू बेडसाठी प्रति दिन ६ हजार रुपये, ऑक्सिजनेटेड बेडसाठी १ हजार ५०० रुपये तर विना ऑक्सिजनेटेड बेडसाठी ८०० रुपये मोजणार आहे.

बीकेसी कोविड सेंटरचे कंत्राटकाम ओम साई आरोग्य केअर प्रा. लि. ( कंत्राट रक्कम ३४ कोटी ५१ लाख रुपये) दहिसर कोविड सेंटरचे कंत्राटकाम लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस (कंत्राट रक्कम १४ कोटी ०५ लाख रुपये), सोमय्या कोविड सेंटरचे कंत्राटकाम अपेक्स हॉस्पिटल मुलुंड या वैद्यकीय संस्थेला(कंत्राट रक्कम ५ कोटी ६३ लाख रुपये),
कांजूरमार्ग कोविड सेंटरचे कंत्राटकाम मेडटायटन्स मॅनेजमेंट (कंत्राट रक्कम २८ कोटी २३ लाख रुपये) आणि मालाड कोविड सेंटरचे कंत्राटकाम रुबी ऍलकेअर सर्व्हिसेस ( कंत्राट रक्कम २२ कोटी ४७ लाख रुपये) अशा ५ खासगी वैद्यकीय संस्थांना एकूण १०५ कोटी रुपयांत कंत्राट स्वरूपात देण्यात येणार आहे.


हेही वाचा – Third Wave of corona: काही दिवसात भारतात येणार Corona ची तिसरी लाट, नव्या रिपोर्टनुसार भारताला अलर्ट जारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -