घरमुंबईएसआरए मुख्यधिकार्‍यांनी सोडवल्या झोपू योजनेतील रहिवाशांच्या समस्या

एसआरए मुख्यधिकार्‍यांनी सोडवल्या झोपू योजनेतील रहिवाशांच्या समस्या

Subscribe

सोमवारी झालेल्या ‘झोपडपट्टी दिना’ला पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच हजेरी लावणारे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी 19 नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येकाला वैयक्तीकरीत्या मार्गदर्शन केले.

मुंबई : विकासकाकडून घरभाडे मिळत नाही, पात्र असूनही अपात्र ठरवले, चुकीच्या पद्धतीने सोडत काढण्यात आली, घरे दिली पण सोईसुविधा दिल्या नाहीत, अशा अनेक समस्यांचा पाढा सोमवारी झोपू योजनेतील रहिवाशांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांच्यासमोर वाचला. तब्बल तीन तास नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर कपूर यांनी संबंधित अधिकार्‍यांना तातडीने समस्या सोडवण्याचे आदेश दिले. त्यामुळे समस्या घेऊन आलेल्या नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधान उमटले.

मुंबईमध्ये विविध ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यात येत आहे. ही योजना राबवताना अनेक ठिकाणी विकासक व सोसायटीचे सदस्य यांच्यामध्ये करारादरम्यान झालेल्या अडचणी, झोपड्या तोडून अनेक वर्ष झाली तरी इमारतीच्या कामाला सुरुवात झाली नाही. विकासक भाडे देत नाही, विकासकाने फसवले आहे, अशा अनेक घटना घडत आहेत. समस्यांसदर्भात एसआरएकडे दाद मागण्याची व्यवस्था आहे. परंतु प्रत्येक व्यक्तीला आपली समस्या वरिष्ठ अधिकार्‍यांसमोर मांडावी अशी इच्छा असते. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एसआरएकडून प्रत्येक महिन्याच्या तिसर्‍या सोमवारी एसआरएमध्ये ‘झोपडपट्टी दिन’ ठेवण्यात येतो. यावेळी फसवणूक झालेल्या झोपडीधारकांना आपली समस्या थेट एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सेक्रेटरी यांच्यासमोर मांडता येते.

- Advertisement -

सोमवारी झालेल्या ‘झोपडपट्टी दिना’ला पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच हजेरी लावणारे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी 19 नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी प्रत्येकाला वैयक्तीकरीत्या मार्गदर्शन केले. संबंधित अधिकार्‍यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. तसेच ज्या समस्या प्राधिकरणाशी संबंधित नव्हत्या त्यांच्याबाबतही त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केल्याची माहिती ‘झोपडपट्टी दिना’निमित्त उपस्थित असलेल्या एका झोपडीधारकाने सांगितले.

‘झोपडपट्टी दिना’निमित्त वर्षभरात 115 जणांनी एसआरएच्या अधिकार्‍यांकडे तक्रारी मांडल्या आहेत. या सर्व तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न यापूर्वी एसआरएचे सेक्रेटरी संदीप देशमुख व अन्य अधिकार्‍यांनी केला आहे. परंतु काही महिन्यांपूर्वी एसआरएचा पदभार स्वीकारलेल्या दीपक कपूर यांनी सप्टेंबरमध्ये प्रथमच हजेरी लावत तब्बल 19 जणांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती एसआरएमधील अधिकार्‍यांनी दिली.

- Advertisement -

आतापर्यंत आलेल्या तक्रारी

‘झोपडपट्टी दिना’निमित्त या वर्षी आतापर्यंत 115 जणांच्या एसआरएकडे तक्रारी केल्या आहेत. यामध्ये १४ जानेवारी, ११ फेब्रुवारी, ११ मार्च, १८ एप्रिल, ८ मे, १३ जून, ३ जुलै, १८ ऑगस्ट, १९ सप्टेंबर रोजी तक्रारी आल्या आहेत.

एसआरएच्या ‘झोपडपट्टी दिना’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी तब्बल तीन तास प्रत्येक झोपडीधारक तक्रारदाराशी वैयक्तिक चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
– दीपक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, एसआरए.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -