घरमुंबईमहापालिका शाळांमध्ये लाकडी बेंचचा प्रस्ताव बारगळला

महापालिका शाळांमध्ये लाकडी बेंचचा प्रस्ताव बारगळला

Subscribe

पॉलिमर डेस्क बेंचचीच खरेदी

महापालिका शाळांमध्ये सागाच्या लाकडाचे बेंच खरेदी करण्यास विरोध झाल्यानंतर आता त्याऐवजी पॉलिमर डेस्क बेंचची खरेदी करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. २०१५-१६ मध्ये पहिली व दुसरीसाठी लहान, तिसरी व चौथीसाठी मध्यम, पाचवी-सहावीसाठी थोडे मोठे आणि सातवी-आठवीसाठी मोठ्या आकाराची १४,७९१ बाकडी खरेदी करण्यात आली आहेत. त्यानंतर आता प्राथमिक विभागासाठी सन २०१८-१९ करीता ए,बी,सी,डी अशा चार वेगवेगळ्या आकाराच्या ८ हजार ९९५ पॉलिमर डेस्क बेंच खरेदी करण्यात येणार आहे. डेस्क बेंचच्या खरेदी प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली असून याच्या निविदा प्रक्रियेची कार्यवाही केल्यानंतर याचा पुरवठा करण्यात येणार आहे.

वयोमान व इयत्तेनुसार विद्यार्थ्यांना सोयीची होईल अशी आसनव्यवस्था असणे आवश्यक असताना महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या आसनव्यवस्थेकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकसमान आसनव्यवस्था आहे. त्यामुळे शाळेत मोठ्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना अभ्यास करणे अत्यंत गैरसोयीचे ठरते. महापालिकेच्या शाळा दहावीच्या परिक्षेसाठी परिक्षा केंद्र म्हणून उपलब्ध करून देण्यात येतात. त्या विद्यार्थ्यांनाही शाळेतील आसनव्यवस्थेचा त्रास होतो. त्यामुळे महापालिका व खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्तानिहाय सुसज्ज अशी स्वतंत्र आसनव्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी ठरावाची सूचना भाजपच्या नगरसेविका आशा मराठे यांनी केली होती. या सूचनेला अभिप्राय देताना प्रशासनाने, शाळांमध्ये लहानमोठ्या अशा चार वेगवेगळ्या आसनव्यवस्था विद्यार्थ्यांना पुरवली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिका शाळांमध्ये वर्षानुवर्ष वापरात असलेली लाकडी बाकडी लवकरच हद्दपार होणार आहेत.

- Advertisement -

सर्व इयत्तांसाठी एकसमान लाकडाची बाकडी असून त्यावर सर्वच वयोगटातील विद्यार्थ्यांना बसणे गैरसोयीचे होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे झाडांची कत्तल काही प्रमाणात थांबणार असून पर्यावरणाची हानी टळणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी लाकडी बेंच खरेदीचा प्रस्ताव मंजुरीला आणला असता भाजपने याला विरोध केला होता. परंतु हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आग्रही होती. मेट्रो रेल्वे प्रकल्पांमध्ये झाडांची कत्तल केली जात असल्याने शिवसेनेकडून विरोध होत असल्याने भाजपने याच मुद्यावर हा प्रस्ताव अडवून या बेंचसाठी झाडांची कत्तल कशी चालते, असा सवाल केला होता. त्यामुळे लाकडी बेंच खरेदीचा प्रस्ताव बाळगळला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -