घरमुंबईराजू शेट्टींची पत्राद्वारे कार्यकर्त्यांना भावनिक साद

राजू शेट्टींची पत्राद्वारे कार्यकर्त्यांना भावनिक साद

Subscribe

दरम्यान शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राजीनामा दिला आहे. तसेच ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच राजू शेट्टी यांनी हे पत्र लिहिले असावे, अशी चर्चा आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. त्यामुळे राज्यात सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पत्राद्वारे भावनिक साद घातली आहे. “माझ्या स्वाभिमानी शिलेदारांनो” असे म्हणून पत्राची सुरुवात करत राजू शेट्टी यांनी यंदाच्या विधानसभा निवडणूकीत ज्वलंत प्रश्न घेऊन उतरावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राजीनामा दिला आहे. तसेच ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच राजू शेट्टी यांनी हे पत्र लिहिले असावे, अशी चर्चा आहे.

राजू शेट्टी यांनी आपल्या पत्रात भाजपामधील पक्षांतरावर टीका केली आहे. त्यांनी पत्रात लिहिले आहे की, “महाराष्ट्रात सध्या राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बहुतेक सर्वच राजकीय नेते आणि कार्यकर्ते सत्तेच्या दिशेने जात आहेत. जे पक्षांतरासाठी नकार देत आहेत त्यांना ईडीची भीती दाखविण्यात येत आहे. आर्थिक कोंडी केली जात आहे. नाईलाजास्तव त्यांनाही भरती व्हावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात विरोधी पक्ष राहतोय का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाची राजकीय वाटचाल एकपक्षीय राजवटीकडे होत आहे,” असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -

विरोधी पक्ष सामान्यांचा आधार

यावेळी राजू शेट्टी यांनी विरोधी पक्षाची गरज विषद करताना पत्रात म्हटले आहे की, “विरोधी पक्ष हा सर्वसामान्यांचा आधार असतो. पण राज्यकर्त्यांनी तो आधार काढून घेण्याचे ठरवलेले दिसते. त्यामुळे या परिस्थितीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सामान्यांचे ज्वलंत प्रश्न, समस्या घेऊन निवडणूकीत उतरणे गरजेचे आहे.”

पत्रात भावनिक साद

कार्यकर्त्यांना सद्य राजकीय परिस्थिची जाणीव करुन देताना राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, चळवळ करणे सोपे नसल्याचे तुम्हाला मागील चार वर्षांत कळले असेलच. पोलिसांचा लाठीचार्ज, खोट्या गुन्ह्यात अडकवणे, माणसे फोडणे एवढेच सत्ताधारी करु शकतात. आपण ईडी, इन्कमटॅक्स, सीबीआयला घाबरणार थोडीच आहोत? एकमेकांमध्ये द्वेष निर्माण करणे, गैरसमज पसरवणे ही त्यांचे वैशिष्ट्य आहे. पण या वादळातही खवळलेल्या समुद्रात स्वाभिमानीचा दिवा घेऊन मी आपलं जहाज समुद्रात सोडलं आहे. दिवा विझू न देता जहाज किनाऱ्यावर न्यायचं आहे. उंचच उंच लाटा येत असून किनारा येणार की नाही मला माहीत नाही. मी या जहाजाचा कॅप्टन आहे. त्यामुळे किनारा गाठण्याचा मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -