घरमुंबईवाहतूक नियमांच्या लोकजागृतीला रेड सिग्नल!

वाहतूक नियमांच्या लोकजागृतीला रेड सिग्नल!

Subscribe

डोंबिवलीतील ट्रॅफिक गार्डनची दुरावस्था ......

बेशिस्त वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस त्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी रोजच झटत असतो. उपलब्ध मनुष्यबळात आणि साधनसामुग्रमध्ये पोलिसांची धडपड सुरू असते. अपघात टाळायचे असतील तर वाहतूक नियमांचे प्रत्येकानेच पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थीदशेत असल्यापासूनच वाहतुकीच्या नियमाविषयी जागृती झाल्यास भविष्यात वाहतूक नियमांचे पालन करणारा एक नागरिक घडणार आहे. या हेतूनेच कल्याण डोंबिवली महापालिकेने वाहतूक उद्यान साकारलं आहे. पण, गेल्या दहा वर्षात उद्यानाची दुरावस्था झाली आहे. सिग्नल यंत्रणा, दिशादर्शक फलक आदी साधनसामुग्रीसुद्धा तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहतुक नियमांच्या लोकजागृतीला रेड सिग्नल आहे.

शालेय विद्यार्थी आणि वाहन चालक यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी यासाठी डोंबिवली पूर्वेतील संगीतावाडी परिसरात माँ साहेब मीनाताई ठाकरे वाहतूक उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानात रस्त्यांची वळणे, वाहतुकीचे नियम, वाहतूक सुचना फलक, सिग्नल यंत्रणा, तीनशे आसन क्षमतेचे पॅव्हेलियन, रखवालदार चौक, पदपथ, बसथांबा आणि पादचारी पुलांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. यासाठी पालिकेने लाखो रूपये खर्च केले आहेत. सध्या उद्यानातील हे साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहेत. सर्वच सिग्नल यंत्रणा पूर्णपणे तुटलेल्या असून त्यातील वायरही काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाहतूक उद्यानात आणले जात नाही. पूर्वी हे उद्यान बंद करून ठेवले जात होते. पण, आता हे उद्यान खुले ठेवण्यात येते.

- Advertisement -

पालिकेतील एक महिला कर्मचारी त्या ठिकाणी असतात. उद्यान खुले ठेवण्यात आल्याने मुले खेळण्यासाठी येतात. त्यांच्याकडूनच सिग्नल यंत्रणेची तोडफोड करण्यात आल्याचे कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले. अनेकवेळा मुले उद्यानात क्रिकेटही खेळतात. पण, पालिकेच्या कर्मचार्‍यांना ते जुमानत नाहीत. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या काळात वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यानंतर या उद्यानाकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. सुरूवातीला शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम कळावेत यासाठी वाहतूक पोलिसांकडून येथे प्रशिक्षण दिले जायचे. आता मात्र हा प्रकारही फारसा पाहायला मिळत नाही. कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून उद्यानाचा वापर व्हावा असा मुद्दा पुढे आला होता. मात्र, आरटीओनेही याकडे दुर्लक्ष केले आहे. डोंबिवली वाहतूक पोलिसांच्या अख्यातरीत हे वाहतूक उद्यान आहे. वाहतूक पोलीस सच्चिदानंद पाटील हे विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांविषयी जनजागृती करीत असत. मात्र, गेल्या दोन वर्षापासून त्यांची वाहतूक विभागातून बदली झाली आहे. त्यामुळे या कामाला खीळ बसली आहे. पालिकेकडून उद्यानाची चांगल्याप्रकारे देखभाल ठेवली जात असली तरी त्यातील तुटलेल्या साहित्याकडे कानाडोळा केला आहे. पालिका प्रशासन, वाहतूक शाखा आणि आरटीओ प्रशासन यांच्या अनास्थेमुळेच वाहतूक उद्यान केवळ शोभेचे ठरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.

ट्रॅफिक गार्डनच्या दुरूस्तीबाबत नवीन अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर दुरूस्ती करण्यात येईल. वाहतूक पोलिसांना हे चालवण्यसासाठी देण्यात आले आहे. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचीमाहिती दिली जाते. मात्र, सध्या शाळा कमी प्रमाणात येत आहेत. त्यामुळे हे उद्यान सर्वांसाठी खुले ठेवण्याचा पालिकेचा मानस आहे.
– संजय जाधव, उद्यान अधिक्षक, केडीएमसी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -