घरमुंबईसचिन वाझे...मु.पो तळोजा कारागृह!

सचिन वाझे…मु.पो तळोजा कारागृह!

Subscribe

तब्बल २७ दिवस तपास यंत्रणेच्या चौकशीला सामोरे गेल्यानंतर सचिन वाझे याची तपास यंत्रणेच्या कचाट्यातून तात्पुरती सुटका झाली असून एनआयए न्यायालयाने सचिन वाझेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाझे याची शुक्रवारी सायंकाळी तळोजा येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. मात्र, हिरेन हत्या प्रकरणात एनआयएकडून पुन्हा वाझे याचा ताबा घेऊन त्याला या गुन्ह्यात अटक करण्याची शक्यता आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्याप्रकरणी १३ मार्च रोजी एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेकडून मुंबई पोलीस दलातील निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला अटक करण्यात आली होती. पाच वेळा एनआयएकडून त्याची एनआयए कोठडी वाढवून घेण्यात आली होती. तब्बल २७ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर शुक्रवारी सचिन वाझे याची एनआयए कोठडी संपल्यामुळे वाझेला न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान एनआयएने सचिन वाझेच्या पत्राबाबत न्यायालयात आक्षेप घेत हे पत्र बाहेर कसे पडले याबाबत न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. याविषयी न्यायालयाकडून वाझेच्या वकिलांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

- Advertisement -

वाझेच्या भावाकडून वाझे याची प्रकृती ठीक नसल्याचे वारंवार सांगितले जात होते. मात्र, एनआयएने सचिन वाझे याची प्रकृती ठणठणीत असून त्याला कुठल्याही उपचाराची गरज नसल्याचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

२७ दिवसांच्या एनआयए कोठडीनंतर न्यायालयाकडून सचिन वाझे याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर वाझे याच्या वकिलांनी सचिन वाझे याला तुरुंगातील सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावे, अशी विनंती न्यायालयात केली असता न्यायालयाने ती मान्य केली आहे. दरम्यान सायंकाळी एनआयएचे अधिकारी यांनी सचिन वाझे याची रवानगी तळोजा तुरुंगात केली असून न्यायालयाच्या आदेशाची प्रत तुरुंगाधिकारी यांच्याकडे सोपवण्यातआली आहे.

- Advertisement -

एनआयएकडून पुन्हा ताबा
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ मिळून आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना अगोदरच अटक करण्यात आली होती. मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटातील मुख्य आरोपी सचिन वाझे असल्याचे उघड झालेले आहे. या हत्येचा तपास देखील एनआयए करीत असून सचिन वाझे याला या गुन्ह्यात मुख्य आरोपी बनवून त्याला अटक करण्यासाठी एनआयए सचिन वाझे याचा ताबा न्यायालयाकडे मागू शकते.

—घटनाक्रम —* २५ फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार मिळून आली होती.* ५ मार्च रोजी स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर येथे मिळून आला होता.* ७ मार्च रोजी एटीएसकडे दोन्ही गुन्हे वर्ग करण्यात आले होते.* ९ मार्च रोजी मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.* मुकेश अंबानी स्फोटके प्रकरण एनआयएकडे तपासासाठी आले.* १३ मार्च रोजी रात्री सचिन वाझे याला अटक करण्यात आली.*१४ मार्च रोजी त्याला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २५ मार्च पर्यंत म्हणजे १२ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली.* २५ मार्च रोजी पुन्हा एनआयए कोठडीत वाढ करण्यात आली. ३ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी .* युएपीजे कायदा कलमात वाढ केल्यानंतर पुन्हा ७ एप्रिलपर्यंत कोठडीत वाढ* ७ एप्रिल रोजी दोन दिवसांची कोठडी वाढवण्यात आली होती .* ९ एप्रिल रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -