घरमुंबईकल्पेशच्या मृत्युमुळे केईएममध्ये तोडफोड

कल्पेशच्या मृत्युमुळे केईएममध्ये तोडफोड

Subscribe

शिवडीतील अर्टिगा अपघात

शिवडी येथील झकेरिया बंदर रोड येथे रविवारी दुपारी झालेल्या अपघातात जखमी झालेल्या कल्पेश धारगे या तरुणावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे त्याचे निधन झाले. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच शिवडीतील झकेरिया बंदर येथून दोनशे ते अडीचशेचा जमाव केईएम हॉस्पिटलजवळ जमा झाला. त्यांनी हॉस्पिटलच्या अपघात कक्षात घुसून तोडफोड केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत केले.

शिवडी येथील झकेरिया बंदर रोड येथे रविवारी दुपारी एका भरधाव मोटारीने बसथांब्यावर उभ्या असलेल्या सहाजणांना धडक देऊन ती मोटार एका ट्रकवर आदळून भीषण अपघात झाला होता. या अपघातात घटनास्थळीच दर्शन पाटील या तरुणाचा मृत्यू झाला होता. मोटारीतील दोनजणांसह एकूण ७ जण जखमी झाले होते. जखमींवर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना जखमींपैकी गंभीर असलेल्या कल्पेश धारगे याचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. कल्पेशच्या मृत्यूचे वृत्त शिवडीमध्ये वार्‍यासारखे पसरताच नातेवाईक, मित्रमंडळी असा सुमारे २००ते २५० जणांचा जमाव हॉस्पिटल भोवती जमा झाला. हा जमाव हॉस्पिटलच्या अपघात कक्षासमोर येऊन त्यांनी या अपघातातील वाहनचालकांच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करीत कल्पेशचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. काही जणांनी अपघात कक्षातील दरवाजावरील आसनांची तोडफोड केली. हॉस्पिटलमध्ये तैनात सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी या जमावाला तेथेच रोखून धरले. काही वेळातच भोईवाडा पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन जमावाला शांत केले. या तोडफोडीत जमावातील चार तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले आहे.

- Advertisement -

सायंकाळी कल्पेशचा मृतदेह त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात दिला असून त्याच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. आईवडिलांना एकुलता एक असलेला कल्पेश हा परळ येथील इंडिया बुल्स येथील कार्यालयात नोकरीला होता. त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रविवारी घरी आलेल्या आत्या आणि मावशी तसेच त्यांची मुले यांना बसमध्ये बसवून देण्यासाठी तो आला होता. या अपघाता प्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अर्टिगा चालक शाहबाज बादी याच्याविरुद्ध भरधाव वेगाने वाहन चालवून दोघांच्या मृत्यूस तसेच इतरांच्या दुखपतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात शहाबाज हा देखील जखमी झाला असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -