घरमुंबईको-विन अ‍ॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे लक्ष्य अशक्य

को-विन अ‍ॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे लक्ष्य अशक्य

Subscribe

को-विन अ‍ॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे मुंबई महापालिकेला निर्धारित लक्ष्य गाठणेही शक्य झाले नाही. मंगळवारी ३२०० कोरोना योद्ध्यांना लस देण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले होते. मात्र प्रत्यक्षात १५९७ जणांनाच लस देणे शक्य झाले.

कोरोना लसीकरणाच्या शुभारंभाला लागलेले को-विन अ‍ॅपच्या तांत्रिक बिघाडाचे ग्रहण मंगळवारीही कायम राहिले. को-विन अ‍ॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे मुंबई महापालिकेला निर्धारित लक्ष्य गाठणेही शक्य झाले नाही. मंगळवारी ३२०० कोरोना योद्ध्यांना लस देण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले होते. मात्र प्रत्यक्षात १५९७ जणांनाच लस देणे शक्य झाले. परिणामी लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या कर्मचार्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

कोरोना लसीकरणाला मंगळवारी सकाळी पुन्हा सुरुवात झाली. मंगळवारी मुंबई महापालिकेने ३२०० जणांना कोरोनाची लस देण्याचे लक्ष्य ठेवले होते. परंतु लसीकरणाला सकाळी सुरुवात होताच पुन्हा एकदा को-विन अ‍ॅपची समस्या निर्माण झाली. अनेक ठिकाणी सकाळी कोविन अ‍ॅप सुरू होत नव्हते. त्यामुळे कर्मचार्‍यांना लसीकरणाचा मेसेजही गेला नाही. मंगळवारी दुपारपर्यंत पालिकेला या तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागले. त्यामुळे मुंबईतील नऊ कोरोना केंद्रांवरील कार्यरत असलेल्या ३२ तुकड्यांच्या माध्यमातून फक्त १५९७ जणांनाच लस देणे शक्य झाले. यामध्ये सर्वाधिक लसीकरण हे केईएम रुग्णालयात झाले. केईएम रुग्णालयामध्ये ३०७ जणांना लस देण्यात आली. त्याखालोखाल राजावाडी रुग्णालयात २८५ जणांना लस देण्यात आली. तर जे.जे. रुग्णालयात सर्वाधिक कमी १३ जणांना लस देण्यात आली.

- Advertisement -

‘लसीकरणासाठी आम्हाला वॉर्डमधून फोन आला. पण मोबाईलमध्ये कोणताही मेसेज मिळाला नसल्याचे सायन रुग्णालयात लसीकरणासाठी आलेल्या एफ/नॉर्थच्या वैद्यकीय समन्वय सुमंत मौर्या यांनी सागिंतले. वडाळा कुष्ठरोग रुग्णालयाचे कर्मचारी संजय धीवर यांनीही वॉर्ड वॉर रुममधून फोन आला, पण कोविन अ‍ॅपवरून मेसेज मिळाला नसल्याचे सांगितले. केईएम रुग्णालयातील लसीकरणाचे नोडल अधिकारी डॉ. रवींद्र केमभावे यांनी सागिंतले की, को-विन अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणी अजूनही आहेत. एकाचवेळी सर्व ठिकाणी लसीकरणाचे काम सुरु असल्याने सर्व्हरवर भार पडत आहे. ज्यामुळे अ‍ॅप सुरू होणे, व्हेरिफिकेशन होणे यामध्ये समस्या येत आहेत. बर्‍याच आरोग्य कर्मचार्‍यांना वॉर्ड वॉर रुमच्या माध्यमातून फोन करण्यात आले आहेत. वॉर्ड वॉर रुममधील प्रतिनिधीकडे आरोग्य कर्मचार्‍यांची यादी असल्याने लाभार्थींना फोन करण्यात येत असल्याचे डॉ. केमभावे यांनी सांगितले.

लसीकरण केलेले आरोग्य कर्मचारी

  • केईएम रुग्णालय – ३०७
  • सायन रुग्णालय – ११०
  • कूपर रुग्णालय – २२९
  • नायर रुग्णालय – १६५
  • व्ही.एन. देसाई रुग्णालय – ५९
  • आंबेडकर रुग्णालय – २३६
  • राजावाडी रुग्णालय – २८५
  • बीकेसी जम्बो सेंटर – १०३
  • भाभा रुग्णालय – ९०
  • जे.जे. रुग्णालय – १३
  • एकूण – १५९७
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -