घरमुंबईउदानी हत्याकांडप्रकरणात ड्रायव्हरला अटक

उदानी हत्याकांडप्रकरणात ड्रायव्हरला अटक

Subscribe

पनवेल येथून घेतले ताब्यात

हिरे व्यापारी राजेश्वर उदानीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी वाहनचालक प्रणीत जोमा भोईर (२०) याला सोमवारी पनवेल येथील एका गावातून अटक केली. या हत्याकांडात ही तिसरी अटक असून प्रणीत हा देखील या कटात सामील होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त अखिलेश सिंह यांनी दिली.

घाटकोपर पूर्व येथे राहणारे हिरे व्यापारी राजेश्वर उदानी हे २८ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह पनवेल तालुका पोलिसांना नेरवाडी परिसरातील जंगलात कुजलेल्या अवस्थेत मिळाला होता. ७ डिसेंबर रोजी पंतनगर पोलिसांनी आणि उदानी यांच्या नातेवाईकामार्फत मृत्यूदेहाची ओळख पटवली होती. तो उदानी यांचाच असल्याची खात्री केली होती. उदानी यांच्या हत्या झाल्याचे स्पष्ट होताच पंतनगर पोलिसांनी भाजपचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी स्वीय सहाय्यक सचिन पवार याला अटक केली होती. दरम्यान या गुन्ह्याचा मास्टर माईंड हत्यारी विभागातील पोलीस शिपाई दिनेश पवार हा देखील असल्याचे तपासात उघडकीस आले होते. मात्र दिनेश पवारला पंतनगर पोलिसांनी ७ डिसेंबर रोजीच एका तरुणीची फसवणूक व अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली होती. त्याला देखील सोमवारी उदानी यांच्या गुन्ह्यात अधिकृत अटक दाखवण्यात आली.

- Advertisement -

उदानी यांच्या हत्येप्रकरणी पंतनगर पोलिसांनी सुमारे ३५ते ४० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यात बारबाला तसेच हिंदी मालिका अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य आणि एका रेल्वे पोलीस शिपायांच्या मुलाचा देखील समावेश आहे. या चौकशी दरम्यान पोलिसांना वाहनचालक प्रणीत भोईर याचा या कटात सहभाग मिळून आल्यामुळे त्याला सोमवारी अटक करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त अखिलेश सिंह यांनी दिली. प्रणीत हा पनवेल तालुक्यातील विचुम्बे या गावात राहणारा आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार प्रणीत हा उदानी यांना ज्या मोटारीतून घेऊन जाण्यात आले ती मोटार चालवत होता, तसेच उदानी यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यानेच जागा निवडली होती, असे सांगण्यात आले.

उदानी यांच्या हत्याप्रकरणी प्रणीत भोईर याला अटक करण्यात आली असून या गुन्ह्यातील ही तिसरी अटक आहे. तसेच आम्ही अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, मात्र अद्याप कुणालाही क्लीनचिट दिलेली नाही.लवकरच या गुन्ह्याचा उलगडा होईल.

- Advertisement -

बारबालेचा जबाब घेतला
उदानी यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी ज्या बारबालेला बोलवण्यात आले होते, पंतनगर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला असून या गुन्ह्यातील महत्वाची साक्षीदार असू शकत,े असे पोलिसांचे म्हणणे आहे.

उदानी यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून त्यांचे अश्लील व्हिडीओ तयार करून त्यांना ब्लॅकमेल करण्याची योजना असावी अशी शक्यता नाकारता येणार नसल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्या अनुषंगानेही आमचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
– पोलीस उपायुक्त अखिलेश सिंह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -