घरमुंबईइंजिनीअरिंग सीईटी आता ऑनलाइन होणार

इंजिनीअरिंग सीईटी आता ऑनलाइन होणार

Subscribe

सीईटी सेलतर्फे चाचपणी सुरु

राज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या एमएचटी सीईटी ही परीक्षा आता ऑनलाइन घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ही परीक्षा ऑनलाइन घेण्यासंदर्भात राज्य सीईटी सेलतर्फे विशेष समिती दाखल करण्यात आली असून येत्या शैक्षणिक वर्षापासून ही परीक्षा सुरु करण्याचा मानस असल्याची माहिती राज्याच्या तंत्र व उच्च शिक्षण विभागातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, या समितीची एक बैठक नुकतीच संपन्न झाली असून राज्य सरकारही याबाबत सकारात्मक असल्याची माहिती हाती आली आहे. त्यानुसार राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाने देखील चाचपणी सुरु केली आहे.

राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाबरोबर इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. त्यात प्रामुख्याने इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाचा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची रांग लागते. या सर्व प्रवेश परीक्षांमध्ये पारदर्शकता यावी म्हणून राज्य सरकारतर्फे सीईटी सेलदेखील उभारण्यात आले आहे. त्यानुसार सीईटी सेलतर्फे या सामाईक प्रवेश परीक्षांचे नियोजन करण्यात येते. दरवर्षी होणार्‍या या परीक्षांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी सीईटी सेलतर्फे राज्य तंत्र शिक्षण परिषदेच्या मदतीने विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचधर्तीवर राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजांच्या प्रवेशासाठी होणार्‍या प्रवेश परीक्षा यापुढे ऑनलाइनरित्या घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला हिरवा कंदील दर्शवित सीईटी सेलचे संचालक डॉ. अनंत रायते यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बसविण्यात आली असून ही समिती परीक्षा ऑनलाइन घेण्याबाबत काम करीत असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी ‘आपलं महानगर’ला दिली.

- Advertisement -

दरवर्षी ३ लाख विद्यार्थी देतात परीक्षा

दरवर्षी सुमारे तीन लाख विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. ज्याप्रमाणे जेईईची परीक्षा ऑनलाइन होते. त्याचधर्तीवर हा बदल केला जाणार असल्याचे कळते. हा बदल करताना राज्यात ज्या ठिकाणी या परीक्षा घेतल्या जातात त्याठिकाणी ऑनलाइनसाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधा आहेत की नाहीत. याबाबत माहिती मागविण्यात आलेली आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सीईटी सेलकडून यासंदर्भातील प्रस्ताव उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. यासंदर्भात सीईटी सेलचे संचालक डॉ. अनंत रायते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -