घरमुंबईजंगलातील रेतीमाफियांना लगाम

जंगलातील रेतीमाफियांना लगाम

Subscribe

वन्यजीव विभागाची धडक कारवाई

तानसा अभयारण्यात असलेल्या तानसा आणि वैतरणा धरणक्षेत्रातून रेतीची चोरटी वाहतूक करणार्‍या सहा वाळूमाफियांवर वन्यजीव विभागाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत रेतीमाफियांना अटक करून 28 लाख 65 हजार रुपयांच्या मुद्देमालासह पाच वाहने जप्त केली, तर दुसर्‍या एका कारवाईत वन्यजीव विभागाने अवैधरित्या खैर जातीच्या वृक्षांची बेकायदेशीर तोड करून चोरट्या मार्गाने वाहतूक करणार्‍या टोळीवर धाड टाकून एकास अटक केली. या वन्यजीव विभागाच्या धाडसी यशस्वी कारवाई सत्रामुळे रेती माफिया, जंगल चोरट्यांची पळता भुई थोडी झाली आहे.

या परिसरात रात्रीच्या वेळेस चोरटी रेती वाहतूक होत असल्याची माहिती वन्यजीव विभागाला मिळाली होती. या रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी तानसा अभयारण्य परिसरात सापळा रचला. याच वेळेस अघई मार्गाने रेती घेऊन जाणारी वाहने आढळून आली. ही वाहने पकडून त्यांच्यावर रेती चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला. या वाळूमाफियांच्या धाडीत पाच वाहने आणि एकूण तीन ब्रास रेती असा एकूण 28 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसर्‍या एका कारवाईत शहापूर तालुक्यातील खर्डी वन्यजीव विभागाच्या जंगलात अवैधरित्या खैर जातीच्या वृक्षांची बेकायदा तोड करून चोरट्या मार्गाने वाहतूक करणार्‍या टोळीवर धाड टाकून एकास वन्यजीव विभागाने अटक केली आहे. या कारवाईत एक पिकअप जीपसह एकूण 12 नग खैराचा लाकुडसाठा असा सुमारे 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल दर्शन ठाकूर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -