घरमुंबईमुंबईसह राज्यात तीन विभागीय केंद्रे सुरू करणार – उत्तमराव पाचारणे

मुंबईसह राज्यात तीन विभागीय केंद्रे सुरू करणार – उत्तमराव पाचारणे

Subscribe

मुंबईसह त्रिपुरा आणि इंदोरमध्ये विभागीय केंद्र सुरू लवकच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा ललित कला अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव पाचारणे यांनी केली.

मुंबई ही कलानगरी असूनही मुंबईत राष्ट्रीय कला अकादमीचे केंद्र नसल्याची खंत सातत्याने कलाकार आणि कला रसिकांकडून व्यक्त आहे. त्यामुळे मुंबईसह त्रिपुरा आणि इंदोरमध्ये विभागीय केंद्र सुरू लवकच सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा ललित कला अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तमराव पाचारणे यांनी केली. साठाव्या राष्ट्रीय कला मेळाव्याच्या उद्धाटनाप्रसंगी ते बोलत होते. मुंबईतील जे. जे. कला महाविद्यालयात आज, सोमवारी गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते या कलामेळ्याचे उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार, बाबा योगेंद्र, राज्याचे कलासंचालक राजीव मिश्र, राष्ट्रीय कला गॅलरीचे संचालक अद्वैत गणनायक आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पंधरा कलावंतांना प्रत्येकी एक लाख रूपयांचा पुरस्कार देवून गौरवण्यात आले. यात प्रसिद्ध कलाकार वासुदेव कामत, जितेंद्र सुतार, सचिन चौधरी, जॉन डग्लस या महाराष्ट्रातील चार कलाकारांचा समावेश होता.

यावेळी बोलताना पाचारणे म्हणाले की, मुंबईत विभागीय कला केंद्र नसल्याने विद्यार्थ्यांना चेन्नईला जावे लागते. त्याना दहा हजार रूपये शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र ही शिष्यवृत्ती तुटपुंजी असून कलावंतांना दरमहा तीस हजार रूपये शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच यापुढे ५०० कलाकारांचा समावेश असलेले त्रैवार्षिक प्रदर्शनही भरवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सरकारने त्यासाठी निधीही मंजूर केल्याची माहिती पाचारणे यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

अयोध्येत उभारणार रामाचा २५० फुटी पुतळा

संस्कारभारतीचे अध्यक्ष बाबा योगेंद्र यांनी यावेळी बोलताना सांगितले की, अयोध्या परिसरात श्रीरामाचा २५० फुटी पुतळा उभारण्यात येणार असून सरकार त्यासाठी जागेची पाहणी आणि खरेदी करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. त्यावेळी शिल्पकला कलावंतानी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कलामेळाव्यात १२० स्टॉल उभारले गेले असून त्यात देशभरातील पेटींग,मूर्तीशिल्प, मिश्रीत माध्यमासह अनेक माध्यमांच्या कलाकृती रसिकांना पाहता येणार आहेत. हे प्रदर्शन सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट आणिं राष्ट्रीय आधुनिक कला गॅलरी येथे २५ मार्च ते ८ एप्रिल २०१९ पर्यंत सुरू राहणार असून याठिकाणी शिल्प आणि चित्रांची खरेदीही रसिकांना करता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -