घरमुंबईयंदा हिंदमाताजवळ केवळ अर्धा तासच पाण्याचा हॉल्ट

यंदा हिंदमाताजवळ केवळ अर्धा तासच पाण्याचा हॉल्ट

Subscribe

परळमधील हिंदमाता सिनेमागृहाच्या चौकात ब्रिटानिया आऊटफॉल पम्पिंग स्टेशनची उभारणी झाली असली तरी या परिसरातील पावसाचे पाणी वाहून नेणार्‍या वाहिन्यांचे काम अर्धवट राहिल्याने यंदाही या भागात पावसाचे पाणी तुंबणारच आहे. पर्जन्य जलवाहिन्यांना झाडांच्या मुळांनी विळखा घातल्याने हा विळखा सोडवून त्यांचे रुंदीकरण करत पाण्याला वाट करून देण्याचे काही काम रखडलेले आहे.

मात्र, भायखळा पोलीस स्टेशन तसेच चिंचपोकळी परिसरातील कामे झाल्याने या भागात पाणी तुंबणे कमी होईल. त्यामुळेच काही प्रमाणात यंदा पाण्याचा निचरा होणार असल्याने हिंदमाता जवळ कंबरेएवढे तुंबणार्‍या आणि तासनतास साचून राहणार्‍या पाण्याचा यंदा अर्धा तासच हॉल्ट असेल. हे पाणी केवळ ६ ते ७ इंचाएवढेच साचेल,असे महापालिका अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

हिंदमाताजवळील ब्रिटीशकालिन वाहिन्यांमध्ये झाडांची मुळे रुतली असल्याने पाण्याच्या प्रवाहात बाधा येत आहे. त्यामुळे या जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले. परंतु पर्जन्य जलवाहिन्यांना विळखा घालून पावसाच्या पाण्याची वाट अडवणारी ही झाडे कापण्यास परवानगी नसल्याने ही कामे रखडलेली आहेत. तांत्रिक कारणांमुळे वृक्ष प्राधिकरणापुढे या झाडे कपण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जात नाही. त्यामुळे मंजुरीच्या प्रतिक्षेत हा प्रस्ताव आहे. जोवर ही झाडे कापली जाणार नाही, तोवर या पर्जन्य जलवाहिनींची कामे पूर्ण होणार नाहीत.

बी. जे. देवरुखकर मार्ग ते मडकेबुवा चौक, लालबाग पोलीस चौकी ते श्रावण यशवंते चौक, महर्षी दयानंद महाविद्यालयालगतचा परिसर आदी ठिकाणी पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे कामे हाती घेण्यात आली होती. ही सर्व कामे फेब्रुवारी ते डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याने किमान हा पावसाळा तरी हिंदमाताला पाणी तुंबेल,असे स्पष्ट होत आहे. यातील भायखळा पुलापर्यंतच्या चेंबरची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. लालबाग पोलीस चौकी ते श्रावण यशवंते चौक दरम्यान जुन्या कमानी पध्दतीच्या ३००० मि.मी रुंदी व २७०० मि.मी उंची असणारी पर्जन्यजल वाहिनी आहे.

- Advertisement -

ही पर्जन्य जलवाहिनी कायम ठेवून या लगतच १८०० व्यासाची अतिरिक्त पर्जन्यजल वाहिनी बांधण्यात येत आहे. लालबाग चिवडा गल्लीजवळ असणार्‍या या पर्जन्यजलवाहिनीचे काम मायक्रो टनेलिंग पध्दतीने केले जात आहे. सध्या याचे बहुतांशी काम पूर्ण झाले असून येत्या जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण होईल,असा विश्वास पर्जन्य जल विभागाच्या अधिकार्‍यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हिंदमाता परिसरातील पाण्याचा निचरा अधिक जलदगतीने होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

हिंदमाता परिसरातील साचणार्‍या पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तीन ठिकाणी कामे हाती घेण्यात आली आहे. काही कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. तर काही ठिकाणी झाडे कापण्यास परवानगी न मिळाल्याने ती रखडलेली आहे. ती कामेही अपेक्षित कालावधीत पूर्ण केली जातील. काही प्रमाणात कामे झाल्याने एरव्ही या परिसरात जे दोन दिवस किंवा तासनतास पाणी तुंबून राहायचे, ते आता राहणार नाही. आता फार फार २० ते २५ मिनिटेच पाणी थांबेल. परंतु हे पाणी अर्धा फुटांपेक्षा अधिक नसेल,असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. -विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -