घरमुंबईगोरेगावमध्ये उभारणार टाऊनशीप

गोरेगावमध्ये उभारणार टाऊनशीप

Subscribe

म्हाडा उभारणार २८ हजार घरे

पश्चिम उपनगरामध्ये गोरेगावमध्ये होणार्‍या घरांच्या निर्मितीमुळे एक नवीन टाऊनशीप उभारणे म्हाडाला अनेक वर्षांनंतर शक्य होणार आहे. गोरेगावात पुनर्वसनाच्या तसेच नव्याने येऊ घातलेल्या प्रकल्पांमुळेच तब्बल २८ हजार इतक्या मोठ्या प्रमाणावर घरे मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार आहेत. मोतीलाल नगर आणि बांगुर नगर (पहाडी गोरेगाव) याठिकाणच्या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती होऊ शकणार आहे.

गोरेगाव मोतीलालनगरच्या पुनर्वसनाचा मार्ग म्हाडाच्या पुढाकारामुळे सुटणार आहे. म्हाडाने या प्रकल्पातील सल्लागार असलेली कंपनी पी. के. दास अ‍ॅण्ड असोसिएट्सला या प्रकल्पासाठी सर्वेक्षणाचे काम करण्यास सांगितले आहे. गेल्या ७ वर्षांमध्ये अतिशय मंदगतीने या प्रकल्पासाठी सर्वेक्षणाचे ५० टक्के काम झाले. पण उर्वरीत कामासाठी आता म्हाडाने सल्लागार कंपनीला तातडीने हे काम करण्यासाठी सांगितले. येत्या तीन महिन्यात सर्वेक्षण पूर्ण करून प्रकल्पाचा आराखडा आणि निविदा प्रक्रियेचा टप्पा सुरू करणे या कंपनीकडून अपेक्षित आहे. गेली अनेक वर्षे दोन सनदी अधिकार्‍यांच्या संघर्षात हा प्रकल्प अडकला होता. पण अखेर या प्रकल्पाला चालना मिळाली आहे.

- Advertisement -

म्हाडाच्या १४२ एकर जागेमध्ये म्हाडाचा मोतीलाल नगर प्रकल्प उभा राहणार आहे. या भूखंडावर आधारीत प्रकल्पाच्या माध्यमातू १८ हजार नव्या घरांची निर्मिती करणे शक्य होईल. तसेच सद्यस्थितीला मोतीलाल नगरमध्ये असणार्‍या ३७०० रहिवाशांचेही पुनर्वसन म्हाडातर्फे करण्यात येईल. सुमारे १८ लाख चौरस फूट इतकी जागा या भूखंडावर पुनर्वसन केल्यावर म्हाडाला उपलब्ध होईल. तर संपूर्ण भूखंडावर नव्याने बांधकाम केल्यावर १२० लाख चौरस फूट इतकी जागा घरांच्या बांधणीसाठी मिळणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी म्हाडाला ५ हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर २५ हजार इतका महसूल म्हाडाला मिळणे अपेक्षित आहे.

सुमारे २० हजार कोटींचा फायदा म्हाडाला या संपूर्ण गृहनिर्माण प्रकल्पातून होतील. मोतीलाल नगरच्या भूखंडावर अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट तसेच मध्यम उत्पन्नाच्या गटासाठी घर बांधणीचा आमचा मानस आहे. या संपूर्ण गृहनिर्माण प्रकल्पाचे मॉनिटरींग म्हाडामार्फत करण्यात येईल, अशी माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी दिली. आचारसंहितेच्या औपचारिकतेचा या प्रकल्पामध्ये कुठेही अडथळा येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. याठिकाणी दवाखाना, शाळा, मार्केट यासारख्या सुविधा देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक नागरिकांच्या पाठिंब्यानेच या संपूर्ण प्रकल्पाची उभारणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

पहाडी गोरेगावमध्येही ६५०० घरे
बांगुर नगर (पहाडी गोरेगाव) याठिकाणीही म्हाडा घराच स्वप्न पूर्ण करण्याची संधी मुंबईकरांना देणार आहे. अगदी लिंक रोडला जोडून असलेल्या आणि इन्फिनिटी मॉल नजीकचा अशी ही मोक्याची जागा आहे. म्हाडाने थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देत हा १८ एकर अतिक्रमण झालेला भूखंड न्यायालयीन लढाईत जिंकला आहे. आता याठिकाणेची संपूर्ण अतिक्रमण हटविण्यात आले आहे. पण या भूखंडावर मुंबई महापालिकेने आरक्षण असल्याचा दावा केला आहे. महापालिकेच्या आरक्षणाचा वादाचा मुद्दा वगळून आता याठिकाणी नव्या घरांची उभारणी करण्यात येईल असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -