घरमुंबईव्यावसायिकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

व्यावसायिकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Subscribe

अखेर शेवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला

घाटकोपरमध्ये राहणार्‍या एका हॉटेल व्यावसायिकाला हॉटेलसह जिवंत पेटवून ठार मारण्याचा खळबळजनक प्रकार ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे घडला होता. तब्बल दीड वर्षांनंतर शहापूर पोलिसांनी या घटनेची नोंद करून सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या वेळी शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल न करता हल्लेखोरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हॉटेल व्यवसायिकाने केला. दीड वर्षे या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर अखेर शहापूर पोलिसांनी स्थानिक हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.

किशोर बर्वे (५५)असे हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. बर्वे हे आपल्या कुटुंबियांसोबत घाटकोपर असल्फा गाव या ठिकाणी राहतात. काही वर्षांपूर्वी बर्वे यांनी हॉटेल व्यवसायाकरिता शहापूर तालुक्यातील सापगाव-किन्हवली रोडवर असलेली जागा मालकीण भीमाबाई अंदाडे यांच्याकडून खरेदी केली होती. त्या जागेवर बर्वे यांनी मालन हॉटेलची सुरूवात केली होती. हॉटेलचा चांगला जम बसल्यानंतर शेजारीच असलेल्या विलास गगे या हॉटेल व्यावसायिकाला त्याची झळ बसू लागली. बर्वे यांचे हॉटेल बंद पडावे यासाठी मग गगे यांनी वेगवेगळे हातखंडे वापरण्यात सुरूवात केली. काही व्यक्ती येऊन माझ्या हॉटेलमध्ये बसण्यास सुरूवात झाली, ते शिवीगाळ करणे, धमकी देणे तसेच मी प्रतिकार केल्यास हॉटेलचे नुकसान करु लागले, असे बर्वे यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले. २९ एप्रिल २०१७ रोजी विलास गगे व त्याच्या आठ साथीदारांनी माझे हॉटेल बंद पडावे म्हणून माझ्यावर हॉटेलमध्येच हल्ला केला. तेव्हा त्यांनी मला हॉटेल बंद करण्यास सांगून जातीवाचक शिवीगाळही केली.

- Advertisement -

मारहाणीची घटना घडल्यानंतर त्याच दिवशी बर्वे यांनी शहापूर पोलिसांकडे याची तक्रार केली. परंतु, पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. तसेच मुख्य आरोपी गगे याचे नावही लिहिले नाही. माझी तक्रार नोंदवून घेणे तर दूरच पण, पोलिसांनी माझ्यासमोरच गगे याला फोन करुन मी तक्रार करण्यास आल्याचे कळवले. पोलीस सहकार्य करत नसल्याचे पाहून मी परत मागे फिरलो, असेही बर्वे यांनी सांगितले.

२७ मे २०१७ रोजी पहाटे २ वाजता पुन्हा बर्वे यांच्या हॉटेलवर गगे यांच्या साथीदारांकडून हल्ला करण्यात आला. यावेळी काचेच्या बाटल्यांमध्ये ज्वलनशील पदार्थ भरुन ते हॉटेलवर फेकण्यात आले तसेच बर्वे यांच्यावरही बाटल्यांचा मारा करण्यात आला, यात बर्वे भाजले. पहाटे ३ वाजता बर्वे यांनी शहापूर पोलीस ठाणे गाठले. रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यानंतर शहापूर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी मला सर्व घटना विचारली व हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले, असे बर्वे यांनी सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी मी, धुमाळ यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी मला हल्लेखोरांशी तडजोड करा, तुम्हांला गावात धंदा करायचा आहे. मी हल्लेखोरांना संध्याकाळी बोलविले असून पुढील कारवाई करणार आहे. परंतु, संजय धुमाळ यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोपही बर्वे यांनी आपल्या तक्रारीत केला.

- Advertisement -

निरीक्षक धुमाळ यांची बदली झाल्यानंतर त्याजागी महेश शेट्ये यांची नेमणूक झाली. परंतु, शेट्ये यांनीही बर्वे यांना कुठलेही सहकार्य केले नाही. पोलीस ठाण्यात न्याय मिळत नसल्याने बर्वे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेतली. अखेर, आता दीड वर्षे खेपा मारल्यानंतर शहापूर पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात २९ नोव्हेंबर २०१८ रोजी भारतीय दंड संहिता आणि अट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

याविषयी शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश शेट्ये यांना विचारले असता, घटना घडली तेव्हा माझ्या आधीच्या अधिकार्‍यांनी त्यावर काय कारवाई केली याविषयी मला माहिती नाही. माझी नियुक्ती झाल्यानंतर बर्वे यांच्या तक्रारीवर तातडीने कारवाई करत गुन्हा दाखल केला असे स्पष्टीकरण दिले. अधिक माहिती विचारली असता हे प्रकरण पोलीस उपअधीक्षकांकडे तपासाधीन आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी तडजोड करण्याचा सल्ला दिल्याचा बर्वे यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. याविषयी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -