घरमुंबईशिवसेनेचा नवा रिमोट कंट्रोल मातोश्री २

शिवसेनेचा नवा रिमोट कंट्रोल मातोश्री २

Subscribe

गेली ५ दशके राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र आणि ठाकरे हे नाव समीकरणच बनून राहीलेले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळी बाळासाहेब दादरमधील कदम मेन्शनच्या दुमजली घरात राहत होते. ९०च्या दशकात ठाकरे कुटुंबिय दादरमधून वांद्य्राच्या साहित्य सहवास कलानगर परिसरात राहायला आले. राज्यात पहिल्यांदाच शिवसेना सत्तेत आल्यानंतर २० वर्षापूर्वी सध्या सत्ताकेंद्र असलेले तीन मजली ‘मातोश्री’ बांधण्यात आले.

हा सर्व इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे २०१८ अखेरीस ‘मातोश्री’ समोरच एक आठ मजली इमारत सज्ज आहे. पुढील वर्षभरात या वास्तूत ठाकरे कुटुंबिंयांचा सहवास वाढेल आणि राज्याचे राजकारण ‘मातोश्री २’मधून ढवळून निघणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ हे सत्ताकेंद्र नव्यानेच तयार होत असलेल्या ‘मातोश्री २’मध्ये सरकण्याची चिन्हे आहेत.

- Advertisement -


गेली तीन दशके हजारो शिवसैनिक आणि नेत्यांसाठी मातोश्री हे दुसरे घरच होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे मातोश्रीवर येणार्‍या शिवसैनिकांची आस्थेने चौकशी करत असत. नव्या ‘मातोश्री २’चे गेटही सर्वांसाठी खुले असतील, अशी भाबडी आशा लाखो शिवसैनिकांत लागून राहिली आहे. नव्या ‘मातोश्री २’चा एक गेट कलानगरात असेल, तर दुसरा गेट बीकेसीत असेल. मात्र शिवसेनाप्रमखांचे वास्तव्याने पावन झालेल्या ‘मातोश्री’तूनच राज्याचा कारभार हाकण्याची इच्छा उद्धव ठाकरे यांची असल्याचे समजते.

- Advertisement -

असंख्य टीका आणि तक्रारींना सामोरे जात या नव्या वास्तू ‘मातोश्री २’ ची उभारणी करण्यात आली आहे. ठाकरे कुटुंबियांच्या अंतर्गत कलहाचेही नवीन वास्तू कारण ठरली होती. शिवसेनाप्रमुखांच्या पश्चात ‘मातोश्री’वरील न्याय हक्कासाठी उच्च न्यायालयात पोहोचलेला ठाकरे कुुटुंबिंयातील वाद नुकताच संपवण्यात आला. आता ही नवीन इमारत शिवसेनेच्या गनिमी काव्याची जबाबदारी खांद्यावर घेणार आहे. या आठ मजली इमारतीला ‘मातोश्री २’ असे नाव देण्यात यावे, असा अनेकांचा कल आहे. पण मूळ ‘मातोश्री’च्या नावात शिवसेनेची ताकद विसावली असल्याने ही वास्तूही ‘मातोश्री’च्याच नावाने ओळखली जावी, असा प्रयत्न पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा असण्याची शक्यता आहे. वांद्य्राच्या कलानगरात सुमारे १० हजार चौरस फुटांच्या ‘मातोश्री’च्या समोरील बंगला ११ कोटी ६० लाखात उद्धव ठाकरे यांनी तीन वर्षांपूर्वी खरेदी केला. कटिंगरी कृष्णा हेबर यांच्या मालकीच्या या बंगल्याचा व्यवहार उद्धव यांनी आक्टोबर २०१६मध्येच पूर्ण केला आणि ही वास्तू ताब्यात येताच ती पाडण्यात आली. सुमारे दोन वर्षांच्या काळात ही वास्तू आता नव्या रुपात उभी राहिली आहे.

जुन्या ‘मातोश्री’ची जागा शिवसेनेच्या गडाला आता अपुरी पडू लागली आहे. यामुळे नव्या ‘मातोश्री 2’च्या निर्मितीला उध्दव ठाकरे यांनी प्राधान्य दिले होते. यासाठी मुंबई महानगरपालिकेतून रितसर परवानग्या घेण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास खात्याच्या माध्यमातून परवानग्यांसाठी वेळोवेळी मदत केल्याचे समजते. मुंबई महापालिकेने ६ मजल्यांची सीसी दिली होती. त्याशिवाय दोन मजले उभारण्यासाठी परळ येथील एसआरए प्रकल्पाचा टीडीआर विकत घ्यावा लागला होता. या विक्री व्यवहाराला महापालिकेने आक्षेप घेतला होता. या आक्षेपाची दखल घेत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारात पाठवून दिले. विशेष बाब म्हणून या व्यवहाराला परवानगी देण्यात आलेली आहे. या मान्यतेनंतर ‘मातोश्री २’च्या उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले. विकत घेण्यात आलेल्या टीडीआरमुळे ‘मातोश्री’तील मार्गिका ९ मीटरची करण्यात आली आहे.

या इमारतीचे डिझाईन वरळीचे नामवंत वास्तूविशारद नवशेर तलाठी यांचे असून, इमारतीची उभारणी मालाडच्या प्लॅटिनम इन्फ्रास्ट्रक्चरने केली आहे. इमारतीचे बाहेरील काम जवळपास पूर्ण झाले असून इमारतीच्या अंतर्गत सजावटीचे काम वेगाने सुरू आहे. तरी इंटिरियर आणि सजावटीसाठी किमान वर्षभर लागेल अशी माहिती शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘आपलं महानगर’ला दिली. पुढील वर्षभरात शिवसेनेची रणनीती ‘मातोश्री २’ मधूनच आखली जाईल.

‘मातोश्री 2’ ही वास्तू उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झाली असून जुन्या ‘मातोश्री’तील आठवणी तशाच कायम ठेवण्याचा प्रयत्न उद्धव यांचा आहे. जुन्या ‘मातोश्री’ शिवसेना आणि बाळासाहेबांच्या अनेक आठवणी असल्याने उद्धवसाहेब जुन्याच ‘मातोश्री’ वास्तव्य आणि बैठका घेतील असा दावाही या नेत्याने केला.

नवे ‘मातोश्री २’ तळमजल्यासह आठ मजल्यांचे आहे. या इमारतील तीन फ्लॅट्स हे ड्युप्लेक्स पध्दतीने उभारण्यात आले आहेत. या ड्युप्लेक्समध्ये पाच शयनगृहे असून, स्टडीरूम, होम थिएटर, स्विमिंग पूल, अत्याधुनिक व्यायाम शाळा (जिम), स्वयंपाक घरे, प्रशस्त हॉल उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या इमारतीतील मजले हे दुप्पट उंचीचे असल्याने त्यातील व्हेंटिलेशन उत्तम प्रकारे निर्माण करण्यात आले आहे. प्रत्येक मजल्यावर ठाकरे कुटुंबातील एक सदस्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रश्मी-उद्धव ठाकरे एका मजल्यावर, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे एका मजल्यावर, तर तेजस ठाकरे एका मजल्यावर राहतील.

शिवसेनाप्रमुखांची निवासस्थाने

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबई आणि त्यातही दादर असे घट्ट नाते होते. १९५०मध्ये बाळासाहेबांचे वास्तव्य दादरच्या खांडके बिल्डिंगमध्ये होते. पुढे 1966 पासून दादरच्या कदम मॅन्शनमध्ये ते राहायला गेले. कदम मॅन्शन ही तेव्हा दोन मजल्याची चाळ होती. कदम मॅन्शनमध्ये बाळासाहेबांचे सर्वाधिक 30 वर्षांचे वास्तव्य होते. तळमजल्यावर बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे राहत असत. १९६६ साली कदम मॅन्शनमध्येच प्रबोधनकारांच्या साक्षीने शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली.त्यानंतर शिवसेनाप्रमुख वांद्य्राच्या साहित्य सहवासात काहीकाळ राहायला गेले. तेथे जुन्या ‘मातोश्री’ची वास्तू उभी राहिली. १९९५मध्ये राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यावर ‘मातोश्री’च्या वास्तूत तळमजल्यासह तीन मजले उभे राहिलेत.

राज्याच्या राजकारणात वांद्रे कलानगरची तीन मजल्यांची ‘मातोश्री’ सर्वांना ओळखीची आहे.
आता तिच्यासमोरच आठ मजल्यांची इमारत दिमाखात उभी राहत आहे. २०१९ अखेरपर्यंत
‘मातोश्री-२’मधून ठाकरे कुटुंबिय कारभार हाकण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -