घरमुंबईCorona Update : फंगसमुळे कोरोना रुग्णांना चाचण्यांचा फेरा

Corona Update : फंगसमुळे कोरोना रुग्णांना चाचण्यांचा फेरा

Subscribe

केईएममध्ये रुग्णांसह, नातेवाईक हैराण झाले आहेत. 

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अधिकाधिक चाचण्या करण्यावर सरकारकडून भर देण्यात येत आहे. मात्र, केईएम रुग्णालयात कोरोना किटमध्ये येत असलेल्या फंगसमुळे रुग्णांना चाचणीसाठी रुग्णालयात दोनवेळा फेर्‍या माराव्या लागत आहेत. फंगसमुळे नमुने बाद ठरवण्यात येत असल्याने दररोज किमान १० रुग्णांना दुसर्‍यांदा स्वॅब घेण्यासाठी बोलावण्यात येत आहे. त्यामुळे संशयित कोरोना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हैराण झाले आहेत. रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेलेल्या रुग्णांना कोरोना चाचणी किंवा कार्यालयामध्ये हजर राहण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. मात्र, केईएम रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी गेलेल्या अनेक रुग्णांना दोनवेळा चाचण्या कराव्या लागत असल्याचे उघडकीस आले आहे.

आरटीपीसीआर चाचणीमध्ये महत्त्वाचे असलेल्या व्हिटीएममध्ये काही दिवसांपासून फंगस येण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. व्हिटीएममध्ये फंगस येत असल्याने अनेक स्वॅब बाद ठरवण्यात येत आहेत. स्वॅब बाद ठरवण्यात आल्याने आरटीपीसीआर चाचणीसाठी नागरिकांना पुन्हा बोलवण्यात येत आहे. काही दिवसांपासून केईएम रुग्णालयात दररोज ८ ते १० नागरिकांना दूरध्वनी करून पुन्हा चाचणीसाठी बोलवले गेले आहे. तसेच चाचणीचा अहवाल नेण्यासाठी आलेल्या नागरिकांचा पुन्हा स्वॅब घेण्यात येत आहे. स्वॅब घेण्यासाठी पुन्हा बोलावण्यात येणार्‍या नागरिकांना तांत्रिक कारणामुळे पुन्हा स्बॅब घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

कोरोना चाचणीमुळे मानसिक तणावाखाली असलेले नागरिक अधिकच तणावाखाली येत आहेत. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना रुग्णांना चाचणीसाठी दोनदा बोलावण्यात येत असल्याने त्यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या रुग्ण संख्येवर नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात असताना आरटीपीसीआर चाचणीसाठी महत्त्वाच्या असलेल्या व्हिटीएममध्ये फंगस सापडत असल्याने पालिकेकडून चाचण्यांबाबत योग्य ती काळजी घेण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. व्हिटीएम या कालबाह्य झाल्या असण्याची किंवा त्यांची हाताळणी व्यवस्थित होत नसल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

केईएम रुग्णालयात अशा प्रकारे कोणत्याही व्हीटीएममध्ये फंगस आलेले नाही. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये एकही कीट खराब झाली नाही. मार्च महिन्यात पाच खराब झाल्या. त्यातील चार रुग्ण हे रुग्णालयात दाखल होते तर एक ओपीडीतील रुग्ण आहे. त्यामुळे यामध्ये तथ्य नाही. – डॉ. हेमंत देशमुख, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -