घरमुंबईजप्त केलेला गुटखा पुन्हा टपरीवर

जप्त केलेला गुटखा पुन्हा टपरीवर

Subscribe

‘एफडीए’त दलालांचा सुळसुळाट

वागळे इस्टेट येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला असून त्यांना पाठबळ देणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कडक कारवाई करून अनधिकृतपणे चालणार्‍या गुटखा विक्रीस आळा घालावा, अशी मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी राज्याचे अन्न व औषध विभागाचे मंत्री जयकुमार रावळ यांच्याकडे केली आहे. जप्त केलेला गुटखा पुन्हा टपरीवर विकला जात असल्याचा आरोप केळकर यांनी केला आहे.

ठाण्यातील महागिरी, मुंब्रा, भिवंडी व इतर काही भागात गुटख्याची विक्री सर्रासपणे होत असून काही अधिकार्‍यांच्या वरदहस्तामुळेच हा धंदा फोफावला आहे. यापूर्वी त्याबद्दलची सविस्तर माहिती संबंधित सह आयुक्त देसाई यांना मी दिली होती,असे केळकर यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याविषयी काय उपाययोजना केली याबाबतची माहिती संबंधित अधिकार्‍यांकडून मला देण्यात आली नाही. हे खेदनजनक असल्याचे केळकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

पोलिसांनी जप्त केलेला गुटखा ज्या गोदामात ठेवला जातो त्या गुटख्याला मध्यरात्री काळोखात पाय फुटून तो बाजारात विक्रीसाठी कसा जातो, या लबाडीची चौकशी करावी. तसेच गुटख्याची विक्री करणार्‍या आरोपीस पकडले तर त्यांना सोडविण्यासाठी कोण दलाल मध्यस्थी करतात यावर नजर ठेवावी, म्हणजे कुंपणच शेत खात असल्याचा अनुभव येईल, असे केळकर यांनी मंत्र्यांच्या भेटीत त्यांना सांगितले.

अन्न व औषध प्रशासन अधिकार्‍यांचे या प्रकरणाकडे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्यामुळेच दलालांचे फावले आहे. अधिकार्‍यांवर कडक कारवाई करून दलालांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केळकर यांनी रावळ यांच्याकडे केली आहे. तसेच स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे, अशी विनंतीही केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -