घरमुंबईछत्रपती शिवाजी महाराजांचे ठाणे पालिकेतील शिल्प कधी दुरुस्त होणार?

छत्रपती शिवाजी महाराजांचे ठाणे पालिकेतील शिल्प कधी दुरुस्त होणार?

Subscribe

नगरसेवक नारायण पवार यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रखडलेल्या राज्याभिषेक शिल्पदुरुस्तीकडे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे थेट लक्ष वेधण्यात आले आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना व प्रशासनाकडून तब्बल चार वर्षे होणार्‍या दिरंगाईबद्दल भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठविले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक शिल्पाच्या दुरुस्तीसाठी 2015 मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली होती. मात्र, निविदेतील वादग्रस्त अटींबरोबरच विविध कारणांमुळे निविदा काढण्यात आली नव्हती. त्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दोन वेळेस दुसर्‍याच दिवशी शिल्पदुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी महापालिका अधिनियमानुसार आर्थिक तरतूद करण्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात दोन लाखांपेक्षा अधिक कामांची निविदा मागविण्याबाबत अधिनियमात तरतूद नाही. त्यामुळे काम प्रत्यक्षात सुरू झालेच नाही.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी नगरसेवक नारायण पवार यांनी 27 ऑगस्ट 2019 रोजी पुन्हा आयुक्त संजीव जयस्वाल यांचे लक्ष वेधले होते. सात दिवसांत निविदा मागवून काम करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. आता आचारसंहिता उठल्यानंतरही कार्यवाही केली जात नसल्यामुळे पवार यांनी थेट उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून रखडलेल्या राज्याभिषेक शिल्पदुरुस्तीकडे लक्ष वेधले.

सध्या जुने झालेले शिल्प झाकून ठेवण्यात आले आहे. मात्र, महापौर, उपमहापौर, सभागृह नेत्यांची कार्यालये जवळ असूनही त्याबाबत कोणीही वेगाने हालचाली करीत नाही, याबद्दल नारायण पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे खंत व्यक्त केली.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावेळी महापौरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सध्याच्या शिल्पकृतीच्या डागडुजीऐवजी दिग्गज कलादिग्दर्शक, शिल्पकार यांचे संकल्पचित्र मागवून नामवंत शिल्पकाराकडून शिल्प बसविण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मात्र, नारायण पवार यांच्या पत्रामुळेच सत्ताधारी शिवसेनेकडून वेगाने हालचाली झाल्या असल्याची पालिका वर्तुळात चर्चा सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -