घरमुंबईसोन्याच्या धारावीला जागतिक निविदेची हॅट्ट्रीक

सोन्याच्या धारावीला जागतिक निविदेची हॅट्ट्रीक

Subscribe

मुंबईच्या मध्यभागी १०४ हेक्टरमध्ये वसलेल्या धारावी पुर्नविकास प्रकल्पाच्या याआधीच्या दोनवेळा फसलेल्या निविदा प्रक्रियेनंतर आता तिसर्‍यांदा या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या निविदा प्रक्रियेचा युएसपी आहे ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ (एसपीव्ही). या प्रकल्पासाठी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने जागतिक निविदा प्रक्रियेसाठी नुकतीच राज्याच्या मंत्रीमंडळानेही परवानगी दिली होती.

कसे असेल एसपीव्ही मॉडेल ?
स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) म्हणजे विशेष प्रकल्प दर्जा राबवताना या मॉडेलमध्ये मुख्य भागिदाराचा ८० टक्के समभाग असेल तर शासनाचा २० टक्के समभाग हा सक्रीय सहभाग असणार आहे.

- Advertisement -

मुदतवाढ देऊनही प्रतिसाद नाही

धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत २००७ – २०११ आणि २०१६ मध्ये याआधी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या दोन्ही निविदा प्रक्रियांना जवळपास पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. पण जागतिक पातळीवर निविदा प्रक्रिया राबवल्यानंतरही धारावी पुनर्वसनासाठी निविदाकर्ते आले नाहीत.

धारावीला महत्व विशेष

मुंबईचे आर्थिक केंद्र असणार्‍या वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्सच्या नजीकचे असे धारावीचे संपूर्ण क्षेत्र आहे. सायन, माहीम, चुनाभट्टी, जीटीबी नगर आणि किंग्ज सर्कल यासारख्या स्टेशनची धारावीला कनेक्टिव्हीटी आहे. मुंबई मेट्रो रेल विकास कॉर्पोरेशनच्या मेट्रो ३ प्रकल्पाअंतर्गत धारावी स्टेशनची कनेक्टीव्हिटी ही दक्षिण मुंबईला मिळणार आहे. तसेच मेट्रोमुळे आंतरराष्ट्रीय एअरपोर्टलाही धारावी जोडली जाईल. एमएमआरडीमार्फत वांद्रे-वरळी सी लिंकला जोडणारा एक मार्ग धारावीपासून जोडण्याचा मानस आहे. मुंबईतील ट्रान्स हार्बर प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आणि धारावी कनेक्टिव्हीटी आणखी सहजशक्य होणार आहे.

- Advertisement -

अशा आहेत एसपीव्हीच्या सवलती

  • मुद्रांक शुल्क सवलत
  • राज्य जीएसटी परतफेड
  • मालमत्ता करामध्ये सवलती
  • फंजिबल प्रिमियम शिथिल करणे
  • प्रिमियम माफी

एकात्मिक मास्टर प्लॅन

सेक्टर 1 ते 5 यांना एकत्र करून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा एकात्मिक मास्टर प्लान विकसित करून जागतिक निविदा मागविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. याबरोबरच, धारावी अधिसूचित क्षेत्राला लागून असलेली, मात्र धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कक्षेबाहेर असलेली रेल्वेची माटुंगा-दादर येथील सुमारे ३६.४२ हेक्टर (९० एकर) तसेच जवळपासची 6.91 हेक्टर जमीन ही धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत समाविष्ट करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

अशी असेल निविदा प्रक्रिया

धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी एसपीव्ही कंपनीची स्थापना करतानाच ३१५० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार्‍या सक्षम निविदाकर्त्याला या प्रकल्पासाठी पात्र ठरविण्यात येईल. तसेच सुरूवातीची ४०० कोटी रूपयांची भांडवली गुंतवणुकही अपेक्षित आहे. या निविदा प्रक्रियेसाठी २८ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. तर निविदा प्रक्रियेदरम्यानची पहिली बैठक १३ डिसेंबरला आयोजित करण्यात आली आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -