घरपालघर मीरा- भाईंदरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी डीप क्लीन ड्राईव्हचा शुभारंभ

 मीरा- भाईंदरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी डीप क्लीन ड्राईव्हचा शुभारंभ

Subscribe

शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी व या स्वछता मोहिमेत लोक सहभाग वाढावा यासाठी स्वतः मुख्यमंत्री मीरा भाईंदरच्या रस्त्यावर उतरणार आहेत, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. 

भाईंदर :- मुंबईमध्ये प्रत्येक विभागात व्‍यापक स्‍तरावर डीप क्लिनिंग (संपूर्ण स्‍वच्‍छता ) मोहीम राबविण्‍यात येत आहे. या मोहिमेला मुंबईत मोठा प्रतिसाद मिळत असल्याने ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ चा विस्तार करत मीरा- भाईंदर शहरात ‘मुख्यमंत्री स्वच्छता अभियान’ राबवले जाणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी ३० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता या मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. मुंबई नंतर ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ राबवणारे मीरा भाईंदर- शहर हे दुसरे शहर ठरणार आहे. शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी व या स्वछता मोहिमेत लोक सहभाग वाढावा यासाठी स्वतः मुख्यमंत्री मीरा भाईंदरच्या रस्त्यावर उतरणार आहेत, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशनानुसार प्रत्येक विभागात व्‍यापक स्‍तरावर डीप क्लिनिंग (संपूर्ण स्‍वच्‍छता ) मोहीम राबविण्‍यात येत आहे. त्याला मुंबईत चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईनंतर या स्वछता मोहिमेचा सर्वत्र विस्तार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबईनंतर डीप क्लिनिंग (संपूर्ण स्‍वच्‍छता ) मोहीम राबविण्यास सुरुवात करणारे मीरा- भाईंदर हे दुसरे शहर ठरणार आहे. स्‍वच्‍छ, सुंदर आणि हरित शहर राहावे यासाठी ही मोहीम ३० डिसेंबर रोजी सकाळी मीरा- भाईंदरमध्ये सुरु होणार असून निरंतर चालणाऱ्या या स्वछता मोहिमेत मीरा- भाईंदर शहर स्वच्छ व सुंदर, हरित करण्यासाठी अनेक उपक्रम , मोहिमा हाती घेतल्या जाणार आहेत.
शनिवारी सकाळी ९ वाजता नवघर नाका हनुमान मंदिर येथून या स्वछता मोहिमेची सुरुवात होईल. हनुमान मंदिर परिसर, येथील मार्केट व तलाव परिसरात स्वच्छता मोहीम सुरु होईल. त्यानंतर प्रभाग क्रमांक १२ मध्ये मुख्य रस्त्यावर स्वच्छता मोहिम राबवली जाणार असून त्यात स्वतः मुख्यमंत्री सहभागी होतील. याच परिसरात महापालिकेची पहिली सीबीएसई  शाळा सुरु होणार असून त्या शाळेला इमारतीला मुख्यमंत्री भेट देतील. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन निर्मितीचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले असून त्या कामाची मुख्यमंत्री पाहणी करतील. आमदार सरनाईक यांच्या विशेष निधीतून मीरा- भाईंदर मनपा क्षेत्रात कचरा संकलन करण्यासाठी १० घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या असून त्या गाड्यांचे लोकार्पणही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार  आहे.
प्रतिक्रिया,
डीप क्लीन ड्राईव्ह अंतर्गत ६८ प्रकारची विविध कामे आम्ही करणार आहोत. शहरातील नागरिकांचे राहणीमान सुधारावे, शहर अधिक स्वच्छ व सुंदर राहावे यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील. ही स्वछता मोहीम पुढील ३ महिन्यात आणखी प्रभावीपणे राबवून यशस्वी केली जाईल. स्वच्छता ही निरंतर व नियमित चालणारी प्रकिया आहे. आता नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेबाबत जाणीव व जागरूकता निर्माण करून, प्रबोधन करण्यासही पालिका तितकेच प्राधान्य देईल. स्वच्छता मोहिमेत प्रबोधन आणि लोक सहभाग यावर आम्ही भर देणार आहे.
– संजय काटकर – आयुक्त, मीरा भाईंदर महापालिका
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -