घरपालघरभाईंदरमधील ९९ कातकर्‍यांना दाखले वाटप

भाईंदरमधील ९९ कातकर्‍यांना दाखले वाटप

Subscribe

भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथील चवळी पाडा येथे झोपड्या उभारून राहणार्‍या आदिवासींना त्यांच्या नावाची ओळख असलेल्या आधारकार्ड, शिधावाटप, घर, वैद्यकीय मदत, शिक्षण आदी कोणत्याच सोयी-सुविधा व योजनांचा लाभ मिळत नव्हता.

भाईंदर :- भाईंदर पश्चिमेच्या उत्तन चवळीपाडा येथील आदिवासी समाजातील कातकरी कुटुंबातील नागरिकांना कातकरी असल्याचे दाखले मिळत नव्हते. त्यांना दाखले मिळावे यासाठी श्रमजीवी संघटनेकडून मागणी करण्यात आली होती. त्या मागणीनुसार तेथील नागरिकांची पाहणी करून ९९ आदिवासी कातकर्‍यांना कातकरी असल्याचे दाखलेवाटप करण्यात आले आहे. या समाजातील नागरिकांना दाखले मिळाल्याने त्यांना आता शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड आदी सुविधा व शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. मीरा- भाईंदरमधील अनेक आदिवासी कुटुंबांकडे आदिवासी जातीचे असताना देखील त्यांच्याकडे दाखले नव्हते. दाखले नसल्यामुळे त्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येत नव्हता. गेल्या अनेक वर्षांपासून ते सरकारी सुविधांपासून वंचित होते. भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथील चवळी पाडा येथे झोपड्या उभारून राहणार्‍या आदिवासींना त्यांच्या नावाची ओळख असलेल्या आधारकार्ड, शिधावाटप, घर, वैद्यकीय मदत, शिक्षण आदी कोणत्याच सोयी-सुविधा व योजनांचा लाभ मिळत नव्हता.

या नागरिकांना दाखले मिळावेत, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून श्रमजीवी संघटनेकडून मागणी केली होती. त्यानुसार काशीमीरा भागात शासनाच्या आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी कातकरी यांना दाखले व सुविधा देण्याबाबत बैठक घेतली होती. यावेळी प्रांताधिकारी उर्मिला पाटील, अपर तहसीलदार नीलेश गौंड, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गावडे, शिधावाटप विभाग, आदी अधिकारी उपस्थित होते. आदिवासी विकास विभागाकडून शुक्रवारी अधिकारी यदुनाथ भोये व सखाराम भोये यांनी उत्तनच्या तलाठी अनिता पाडवी आदींसह चवळी पाडा येथे आदिवासी कातकरी वस्तीची पाहणी केली. यावेळी श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. पडताळणी व चौकशीनंतर वस्तीतील आदिवासी कातकरी असल्याचे निष्पन्न झाले. आदिवासी विभागाकडून नोंद करून झाल्यावर अपर तहसीलदार गौड यांच्या निर्देशानुसार त्यांना आदिवासी कातकरी असल्याचे दाखले देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ९९ आदिवासी कातकरी असल्याचे दाखले वाटप करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -