घरपालघरजव्हारमध्ये साथीचे आजार बळावले

जव्हारमध्ये साथीचे आजार बळावले

Subscribe

यात अनेकदा जागेचा प्रश्न उद्भवत असून हे रुग्णालय २०० खाटांचे होऊन सुसज्ज इमारत आवश्यक आहे.नवी इमारत झाल्याने रुग्ण सेवा देणे सोयीस्कर होऊन उपचार पद्धतीत आधुनिकता येवू शकते.

जव्हार : सततच्या अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल होऊन हवेतील गारवा वाढला होता. परंतु, आता पावसाने उसंत घेतल्याने वातावरणात दमटपणा आणि उष्णता वाढली आहे. वातावरणातील या बदलामुळे जव्हार हे तापाने फणफणले असल्याची परिस्थिती आहे.तर उपचारासाठी जव्हार उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची तोबा गर्दी होत आहे. त्यात प्रामुख्याने सर्दी, ताप, खोकला, टायफाईड, डेंगी सारखे आजार बळावले आहेत. असे आजार बालकांसह महिला व वृद्धांचे प्रमाण जास्त आढळून आले आहेत. जव्हार शहरात सध्या डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डुकरांचा देखील सुळसुळाट वाढला आहे. दरम्यान, डेंग्यू सदृश्य आजाराच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अनेकांना तपासणीत टाईफाईड निघत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे डास निर्मूलनासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक असल्याचे नागरिक बोलत आहेत. जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यातील रुग्णांचा अतिरिक्त भार जव्हार रुग्णालयावर असल्याने , उपलब्ध मनुष्यबळ व साधन सामग्रीतून रुग्ण सेवा देण्यात येते. यात अनेकदा जागेचा प्रश्न उद्भवत असून हे रुग्णालय २०० खाटांचे होऊन सुसज्ज इमारत आवश्यक आहे.नवी इमारत झाल्याने रुग्ण सेवा देणे सोयीस्कर होऊन उपचार पद्धतीत आधुनिकता येवू शकते.

सध्या शहरासह तालुक्यात रोजच्या ओपिडीत ३०० पेक्षा अधिक रुग्ण येत असतात, त्यापैकी जवळपास १०० रुग्ण आलटून पालटून ताप येणे, सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शनचे असून यामध्ये डेंगी, टायफॉइडची लक्षणे असलेले रुग्ण आहेत.
– डॉ. रामदास मराड, वैद्यकीय अधीक्षक, पतंग शाह उपजिल्हा रुग्णालय, जव्हार

- Advertisement -

शहरात सध्या घाण पाण्याचे डबके, अस्वच्छ नाल्या व डुकरांचा मुक्त संचार असल्याने डेंग्यूचा शिरकाव झाला आहे. यावर नगर परिषद प्रशासनाच्या माध्यमातून उपाययोजना होणे क्रमप्राप्त आहे.
– विशाखा अहिरे, माजी नगरसेविका

जव्हार शहर व परिसरात स्वच्छता बाबत आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी देखील आसपासच्या परिसरात उघड्यावर कचरा न टाकता घंटा गाडीत कचरा टाकण्याची सवय लावून घ्यावी.
-मानिनी कांबळे, मुख्याधिकारी, जव्हार नगर परिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -