घरपालघरमुख्यमंत्र्याच्या हस्ते महापालिकेच्या कॅशलेस रुग्णालयाचे लोकार्पण

मुख्यमंत्र्याच्या हस्ते महापालिकेच्या कॅशलेस रुग्णालयाचे लोकार्पण

Subscribe

मुंबई- अहमदाबाद महामार्गावर महापालिकेच्या भारतरत्न स्व. लता मंगेशकर नाट्यगृहाला लागूनच सुविधा भूखंडावर महापालिकेचे पहिले कॅशलेस रुग्णालय बांधण्यात आले आहे.

भाईंदर :- मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक सुपरस्पेशालिटी कॅशलेस रुग्णालयाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज १४ फेब्रुवारी रोजी बुधवारी सायंकाळी ६ वाजता केले जाणार आहे. या रुग्णालयात सरकारी योजनेतून सर्व वैद्यकीय उपचार आणि मोठ्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार असल्यामुळे रुग्णांसाठी तो मोठा आधार ठरणार आहे. त्यासोबतच भाईंदर पूर्व येथे फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्र याचेही लोकार्पण केले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रुग्णालयाचे लोकार्पण झाल्यानंतर मुख्य कार्यक्रम लता मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार, पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, राज्यसभा खासदार कुमार केतकर, खासदार राजन विचारे, विधान परिषद आमदार निरंजन डावखरे व रमेश पाटील आणि ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन आणि मिलिंद म्हैसकर अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग हे उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे नियोजन मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी केले आहे.

मुंबई- अहमदाबाद महामार्गावर महापालिकेच्या भारतरत्न स्व. लता मंगेशकर नाट्यगृहाला लागूनच सुविधा भूखंडावर महापालिकेचे पहिले कॅशलेस रुग्णालय बांधण्यात आले आहे. वास्तविक २३ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी रुग्णालयाचे लोकार्पणाचा मुहूर्त नक्की करण्यात आला होता. मात्र रुग्णालयाचे काम पूर्ण होऊ न शकल्यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. रुग्णालयात एकंदर १०० खाटांची सुविधा आहे. मीरा -भाईंदर मधील पहिले तर महाराष्ट्र राज्यातील हे दुसरे सरकारी सुपर स्पेशालिटी कॅशलेस रुग्णालय हे असणार आहे. रुग्णालयाची इमारत महापालिकेला विकासकाकडून सुविधा भूखंडावर टीडीआरच्या माध्यमातून मोफत बांधून मिळाली आहे. तर रुग्णालयात आवश्यक असलेली सर्व आधुनिक यंत्रसामग्री आणि वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी आमदार सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून २५ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करून आणला. त्यामुळे रुग्णालयासाठी महापालिकेचा एक रुपयाही खर्च झालेला नाही. राज्य सरकारच्या ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ अंतर्गत सर्व वैद्यकीय उपचार, महत्वाच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात मोफत होणार आहेत. कर्करोग उपचारासह अँजिओप्लास्टी, बायपास हार्ट सर्जरी, व्हॉल्व्ह बदलणे आणि पेसमेकर अशा अनेक मोठ्या शस्त्रक्रिया व त्यावरील उपचार याठिकाणी मोफत होणार आहेत. त्यामुळे पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारका रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे. रुग्णालयातील सर्व कामे अंतिम टप्प्यात आहेत. राहिलेली छोटी – मोठी कामे सुद्धा पूर्ण होत आहेत. रुग्णालयाची इमारत लोकार्पणासाठी सज्ज आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -