घरपालघररिक्षावाले करतात लूटमार,गप्प आहे सरकार

रिक्षावाले करतात लूटमार,गप्प आहे सरकार

Subscribe

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार एमएमआरडीए रिजनमध्ये १ ऑक्टोबर २०२२ पासून रिक्षाची नवीन दरप्रणाली प्रति दीड किलोमीटरसाठी २३ रुपये लागू करण्यात आले आहेत.

वसई : एमएमआरडीए रिजनमध्ये १ ऑक्टोबर २२ पासून नवीन दरप्रणाली लागू करण्यात आली आहे. मात्र, वसई विरार परिसरात नवी दरप्रणालीला फाटा देत रिक्षाचालक प्रवाशांची लुटमार करतच आहेत. त्यावर आरटीओ आणि वाहतूक पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याने रिक्षाचालकांशी त्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याची तक्रार करत याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवाशी संघटनेने जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
वसई,नायगाव, नालासोपारा व विरार परिसरात मागील तीन वर्षांपासून रिक्षा चालकांकडून सामान्य रिक्षा प्रवाशांची फसवणूक करून आर्थिक लूटमार केली जात आहे. याचा प्रवासी संघटनेच्यावतीने दीड वर्षापासून शासनाकडे पाठपुरावाही सुरू आहे. याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार एमएमआरडीए रिजनमध्ये १ ऑक्टोबर २०२२ पासून रिक्षाची नवीन दरप्रणाली प्रति दीड किलोमीटरसाठी २३ रुपये लागू करण्यात आले आहेत.

नवीन दरप्रणाली येऊनही पालघरमध्ये त्याची अमलबजावणी का होत नाही? पूर्वी हेच रिक्षाचे दर प्रति दीड किलोमीटरला २१ रूपये होते. त्यावेळी येथे शेअरिंग रिक्षाचे १० रूपये होते. ते सर्वसामान्यांना परवडणारे होते. मात्र आज मिटरचे २३ रूपये करून रिक्षाचालक परसिट २० रूपये घेऊन ४ सिटांचे ८० रूपये घेऊन प्रवाशांना लुटत आहेत. हा पैसा कोणाच्या घशात जात आहे?, असा प्रश्न संघटनेनेच विचारला आहे. वसई- विरार व पालघरमध्ये ८०% रिक्षा ह्या सिएनजीवर चालतात. नजिकच्या मुंबई महापालिका, मिरा भाईंदर महापालिका हद्दीमध्ये मिटर प्रणाली चालते. मग वसई-विरारकरांनीच शासनाचे काय घोडे मारले आहे, असा संतप्त सवाल प्रवासी संघटनेने जिल्हाधिकार्‍यांना केला आहे.
दरवाढीसंदर्भात प्रवासी संघटनेच्यावतीने मागील दीड वर्षापासून वसई आरटीओ व मिरा -भाईंदर, वसई -विरारचे पोलीस आयुक्त यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला जात आहे. मात्र, संबंधितांना या संदर्भात सर्व अधिकार असूनही हे रिक्षादर कमी का केले जात नाहीत?. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तर नाही ना अशी शंका सर्वसामान्य प्रवाशांना येऊ लागली असल्याचे प्रवासी संघटनेने म्हटले आहे. म्हणून त्याची चौकशी करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक आणि सेक्रेटरी यशवंत जड्यार यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली
आहे.

- Advertisement -

किलोमीटरला २३ ऐवजी ८० रूपये
वसई-विरार महापालिका हद्द व उर्वरित पालघर जिल्हामध्ये रिक्षा शेअरींगचे लॉकडाऊनमधील २० रुपये प्रतिसिट व ४ सिटा घेऊन प्रत्येक दीड किलोमीटरला २३ ऐवजी ८० रूपये घेतले जात आहेत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील दररोज १० लाख रिक्षा सामान्य प्रवाशांची भयंकर आर्थिक लुटमार करणारी फसवी भ्रष्ट शेअरींग रिक्षा पध्दत बंद करून मुंबईप्रमाणे मिटर प्रणाली सुरू करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -