घरपालघरपाण्याचे वांदे...पण ग्रामस्थांचे मजबूत इरादे

पाण्याचे वांदे…पण ग्रामस्थांचे मजबूत इरादे

Subscribe

गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळा संपल्यावर हे लोक ओढ्याच्या जमिनीत खड्डा खणून इथल्या पाण्यावर आपली तहान भागवत आहेत.

डहाणू: डहाणू तालुक्यातील चळणी गावच्या हद्दीत खुंटपाडा येथील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून डबक्यातील (बुडकी विहीर) पाणी पिऊन गुजराण करावी लागत होती. पाड्यात पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करून सुद्धा ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी स्वखर्चातून श्रमदानातून विहीर बांधली आहे. चळणी खुंटपाडा येथे साधारण 10 ते 12 घरांची वस्ती असून येथे लहान मुले व वृद्ध मिळून 80 ते 90 लोक वास्तव्य करतात. येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी साधारण एक किलोमीटर अंतरावर सुविधा उपलब्ध आहे. खुंटपाडा वस्ती शेजारून पावसाळ्यात ओढा वाहतो. हा ओढा पावसाळा संपल्यावर काही आठवड्यात सुकतो. वस्ती नजीक पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे येथील नागरिकांनी शेजारीच असलेल्या ओढ्याच्या जमिनीत खड्डा करून स्वतःसाठी पाण्याची सोय उपलब्ध केली. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळा संपल्यावर हे लोक ओढ्याच्या जमिनीत खड्डा खणून इथल्या पाण्यावर आपली तहान भागवत आहेत.

तर पावसाळ्यात ओढ्याच्या कोपर्‍यावर खड्डा खणून तिथले पाणी प्यावे लागत होते. श्रमदानातून खड्डा तर झाला मात्र विहिरीमध्ये बांधकाम करण्यासाठी पैश्याची कमतरता भासू लागली. यासाठी ग्रामस्थांनी एकत्र होऊन सर्व मिळून पैसे गोळा केले. विहिरीच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य खरेदी करून सर्वांनी एकजुटीने विहीर बांधण्यास सुरुवात केली. उनाताणात काम करून काही दिवसातच विहीर बांधून पूर्ण झाली आहे. मात्र पावसाळ्यात विहिरीला ओढ्याच्या पाण्याचा धोका होण्याची शक्यता असल्यामुळे विहिरीची उंची वाढवण्याची आवश्यकता नागरिकांनी व्यक्त केली आहे. यासाठी शासनाकडून विहिरीसाठी आर्थिक मदत मिळावी अथवा विहिरीची काम पूर्ण करून मिळावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisement -

 

गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या वस्तूच्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता करून देण्याची मागणी आम्ही करत आहोत. मात्र ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे अखेर आम्ही ग्रामस्थांनी मिळून स्वखर्चातून विहीर बांधण्याची योजना आखली. विहीर बांधून पूर्ण झाली आहे. मात्र विहिरीची उंची अजून वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी तरी शासनाकडून मदत मिळावी अशी आमची मागणी आहे.
– अनिल कुर्‍हाडा, खुंटपाडा (चळणी)

- Advertisement -

चळणी खुंटपाडा येथील प्रकरणाविषयी ग्रामसेवकांकडे अधिकची माहिती मागवली आहे. प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल.
– पल्लवी सस्ते, गटविकास अधिकारी, पंचायत समिती डहाणू.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -