वसईः ‘उद्याला आम्ही आमदार असू किंवा नसू, पण भविष्यात तुम्हाला पाणी समस्या भेडसावणार नाही, याची ग्वाही मी तुम्हाला आजच देतो,` अशी ग्वाही आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विरार येथील कोकण नगर रहिवासी संघाच्या वर्धापन दिन समारंभात बोलताना दिली. ‘वसई-विरार शहरावर प्रेम आहे, म्हणून आपण कुणीच इथे आलेलो नाहीत. गावात राहता येत नाही, नोकरी-धंदा, मुलांना शिक्षण हवे म्हणून आपण इकडे आलो आहोत. अनेकांचे कुटंबप्रमुख इकडे म्हणून महिलांना इकडे यावे लागले आहे. मुंबईत घर घेणे परवडत नाही म्हणून आपण इथे आलो आहोत. त्यामुळे अनेकांनी वसई-विरारचा पर्याय निवडला. त्यातून आज वसई-विरार शहराची लोकसंख्या वाढत आहे. पण, पूर्वीच्या तुलनेत आपण या शहराची तहान भागवण्यात यशस्वी झालो आहोत. लोकसंख्या कमी-अधिक होईल, तसे पाण्याची गरज ही भासतच राहणार आहे. पण भविष्याची गरज लक्षात घेऊन आपण अनेक योजना मार्गी लावत आहोत,` अशी माहितीही यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली.
‘चाळींत राहण्याची मजा काही और असते. आम्हीदेखील चाळींत राहिलो आहोत. चाळीतील लोक एकमेकांच्या अडीअडचणींत धाऊन जातात. ब्लॉकमध्ये मात्र हे घडत नाही. त्याठिकाणी प्रत्यक्षात डोळे ब्लॉक होतात,` अशा आठवणी सांगत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विरार-पद्मा कॉलनीतील आपल्या जुन्या आठणींना उजाळा दिला.
चाळींत राहण्याची हीच खासियत असते. इथले लोक एकमेकांच्या मदतीला-अडीअडचणीला धावून जातात. चाळीत एकोपा असतो. पूर्वी पडद्यावरील पिक्चर पाहण्याची मजा असायची. पडद्याच्या दोन्ही बाजूला लोक जागा अडवून बसायचे. यात जसा आनंद असतो. तसाच नळावरच्या पाण्याकरताच्या भांडणांतही आनंद असतो. आज तुम्ही नळावर आहात, तसे काल आम्ही होतो. पण, आता पाणी उपलब्ध झाल्याने ही भांडणे कमी झाली असावीत,` अशी मिश्कील खोडही आमदार हितेंद्र ठाकूर यांनी यावेळी काढली. माजी स्थायी समिती सभापती जितूभाई शहा, पंकज ठाकूर, प्रशांत राऊत, मीनल पाटील, आनंद वडे, राजन पोतदार यावेळी उपस्थित होते.