घरराजकारणLoksabha Election 2024 : रायगडमधील 'जात' फॅक्टर कुणाला धक्का देणार?

Loksabha Election 2024 : रायगडमधील ‘जात’ फॅक्टर कुणाला धक्का देणार?

Subscribe

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रायगडमध्ये जात फॅक्टर मोठी भूमिका बजावेल, अशी शक्यता आहे. रायगडमध्ये ओबीसी आणि मराठा सर्वाधिक आहेत. त्यामुळे मतदारांचा कल कसा असेल, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे रंग भरू लागले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या मतांची जोरदार जुळवाजुळव सुरू केली आहे. तरीही सर्वांचा भर जातींवर असल्याचे दिसून येते. आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच गाजतोय. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील उमेदवारांचेही भवितव्य स्पष्ट होईल, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत जात फॅक्टरचा मोठा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा… ’ मतदानाला जायायचे आहे, आपले कर्तव्य बजावायचे आहे’; खालापूरात मतदार जनजागृती

- Advertisement -

रायगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने प्राबल्य आहे ते ओबीसी मतदारांचे. त्यानंतर मराठा, एसटी, मुस्लीम, एससी आणि अन्य जाती-धर्मातील मतदारांचा समावेश होतो. मात्र, या सर्व जात घटकातील बहुतांश मतदार केंद्र सरकारच्या आजवरच्या धोरणांवर नाराज असल्याचे चित्र आहे. ओबीसी-मराठा समाजात सरकारने आरक्षणावरुन भांडणे लावल्याने हे सर्व जाती-धर्माचे मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहणार, याची उत्सुकता रायगड जिल्ह्यात सर्वांनाच आहे.

हेही वाचा… रायगड जिल्ह्यातील १३४ संस्थांसह २ दूध केंद्राचे ‘शटर डाऊन‘

- Advertisement -

देशात 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकामध्ये जाती-धर्माच्या नावांचा वापर झाला. असे असताना रायगड जिल्ह्यात जाती-धर्मांचा फारसा प्रभाव दिसला नाही. विशेष म्हणजे या दोन्ही निवडणुकांमध्ये मोदी लाटेचा प्रभावदेखील दिसला नाही. रायगडातील मतदारांनी अशा लाटांना कधीच खतपाणी घातले नाही, हा इतिहास आहे.

ओबीसी, मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे बॅ. ए.आर. अंतुले या मुस्लीम समाजातील व्यक्तीला निवडून दिले आहे. अंतुले यांनी 1989, 1991, 1996 आणि 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. 1952 ते 2019 पर्यंत सर्व जाती-धर्मातील उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीत नशीब अजमावले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ओबीसी समाजातील उमेदवार विजयी झालेला आहे.

सर्वच समाजाची मते ही दोन्ही प्रमुख उमेदवारांना मिळत आली आहेत. देशामध्ये सध्या जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करून मतांचे विभाजन करण्याचा डाव आखला जात आहे. हे आता लपून राहिलेले नाही. तरीही असल्या प्रकारांना रायगड जिल्ह्यातील मतदारांनी कधीच थारा दिलेला नाही. रायगड लोकसभेत ओबीसी आणि मराठा समाजाची ताकद मोठी आहे.

परंतु, मराठा आरक्षण प्रश्नावरुन शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुती सरकारवर मराठा समाजाची मोठी नाराजी आहे. राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाज पुरस्कृत एक अपक्ष उमेदवार उभा राहू शकतो. विशेष म्हणजे, हा उमेदवार मराठा, धनगर, मुस्लीम, दलित या समाजाचाही असू शकतो.

मराठा समाजाला काय वाटतं?

मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आतील आरक्षण दिले नाही. सरकार आपल्या शब्दाला जागले नाही. त्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष विनोद साबळे यांनी ‌सांगितले. ‘इंडिया’ आघाडीने रायगड लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी उमेदवारी दिली आहे. तर अनेत गीतेंसमोर महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांचे तगडे आव्हान आहे.

ठाकरेंची भूमिका

रायगड जिल्ह्यात मुस्लीम, एसटी, एससी आणि अन्य जाती-धर्मातील मतदारांची भूमिकादेखील निर्णायक ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी कडवट हिंदुत्वाला दूर सारत राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व असे अधोरेखित केले होते. त्यामुळे येथील सभांना मुस्लीम समाजाचाही जोरदार प्रतिसाद मिळाला होता. याकडे भाजपा दुर्लक्ष करता येणार नाही.

रायगड जिल्ह्यात तब्बल २३ लाख १६ हजार ५१५ मतदार आहेत. तसेच यात अगदी जातनिहाय पाहायचे तर ओबीसी मतदारांचा टक्का ५२ आहे आणि मराठा मतदार २० टक्के आहेत. मराठा आरक्षणासाठी जानेवारीमध्ये मनोज जरांगे-पाटील नवी मुंबईत धडकले होते तेव्हा त्या मोर्चाला रायगडमधून मोठी कुमक मिळाली होती, ही बाब कुणालाही नजरेआड करता येणार नाही.

रायगडमधील ‘जात’ फॅक्टर

ओबीसी – 52 टक्के (12,04,587 मतदार)

मराठा – 20 टक्के (4,63,303 मतदार)

एसटी – 12 टक्के (2,77,981 मतदार)

मुस्लीम – 10 टक्के (2,31,651 मतदार)

एससी – 5 टक्के (1,15,825 मतदार)

इतर (ब्राम्हण, जैन, गुजराती, शीख, पारसी) 1 टक्का (23,165 मतदार)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -