घरश्रावण स्पेशलMangala Gauri Vrat 2020: श्रावणात असे करावे मंगळागौरी व्रत

Mangala Gauri Vrat 2020: श्रावणात असे करावे मंगळागौरी व्रत

Subscribe

जाणून घ्या, मंगळा गौरीची पूजा, व्रत आणि आरती

श्रावण महिना हिंदू धर्मात खूप शुभ समजला जातो. या महिन्यात अनेक उपवास, व्रत- वैकल्य केली जातात. या महिन्यात अनेक सण समारंभ साजरे केले जातात. अगदी घरगुती सणांचाही हा महिना मानला जातो नवीन लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते.

श्रावणात मंगळागौर पुजनाला अतिमहत्त्व आहे. या दिवशी लग्न झालेल्या महिला मंगळागौरीची पूजा करतात. जसा श्रावण महिना भगवान शंकराला प्रिय असतो. त्याचप्रमाणे शंकरासोबत देवी पार्वतीचीही पूजा केली जाते. देवी पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी सोळा सोमवारचे कडक व्रत केले होते. त्याचप्रमाणे नवविवाहित महिला आपल्या पतीसाठी तसेच संतानासाठी ही पूजा करतात.

- Advertisement -

अशी करा मंगळागौरीची पूजा

मंगळागौर श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच अर्थात लग्नाला पाच वर्ष पूर्ण न झालेल्या किमान पाच नवविवाहितांनाही बोलावून एकत्र पूजा केली जाते. नंतर रात्री जागरण करतात.

- Advertisement -

या दिवशी नवविवाहित स्त्रिया या दिवशी सकाळी स्नान करून, सोवळे नेसून पूजेला बसतात. मंगळागौर म्हणजे लग्नात अन्नपूर्णाची धातूची मूर्ती मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात. भटजींना बोलावून मंगळागौरीची षोडषोपचारपूजा करतात. त्यानंतर मंगळागौरीची कहाणी वाचतात. ‘गौरी गौरी सौभाग्य दे’ अशी प्रार्थना यावेळी केली जाते.

पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करुन सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. नंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. शक्यतो मुक्याने जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात. या सवाष्णींना काही वस्तूंचे वाण दिले जाते.

व्रताचे साहित्य

अक्षता, पाच सुपाऱ्या, पाच बदाम, पाच खोबऱ्याच्या वाटया, सोळा प्रकारची पत्री (पाने), दोन वस्त्र, केळी किंवा पेरूचा नैवेद्य, पंचामृत, दुधाचा नैवेद्य, जानवे, सोळा विडयाची पाने, गणपतीसाठी सुपारी, आठ वाती, कापूर, गुलाल, बेल, फुले, दुर्वा, सोळा काडवाती, एक नारळ, कापड, हळद-कुंकू, अन्नपूर्णा देवीची मूर्ती

अशी करावी मंगळागौरची पूजा

विविध प्रकारच्या १६ झाडांची पाने या पुजेसाठी वापरली जातात. आयुर्वेदात या झाडांचे महत्त्व सांगितले आहे. हळद कुंकू वाहून पुजा केली जाते. त्यानंतर मंगळागौरीची कहाणी वाचतात. आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद दिला जातो. यावेळी पुजेसाठी आलेल्या सवाष्ण महिला भोजन करतात. दरम्यान, ज्यांनी मंगळागौरीची पूजा केली आहे त्यांनी मौन धारण करून जेवायचे असते असे सांगितले आहे.या जेवणानंतर तुळशीचे पान खाल्ले जाते. संध्याकाळी महिलांना हळदीकुंकूवासाठी बोलावले जाते. यावेळी सवाष्ण महिलांना हळद-कुंक, विड्याची पाने, सुपारी आणि हातावर साखर देतात. तसेच गहू घेऊन ओटी भरली जाते. रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती केली जाते.

त्यानंतर रात्रभर मंगळागौरीचा जागर करतात. सर्व महिला मिळून गाणी, खेळ, फुगडया घालतात. यावेळी फुगडीचे विविध खेळ खेळले जाात. आगोट्या पागोट्या असतात. तसेच गाणीही म्हटली जातात. सकाळ झाल्यावर स्नान करून मंगळागौरीला दहीभाताचा नैवेद्य दाखवला जातो. नंतर मंगळागौरीची आरती दिली जाते.

जागरणात महिलांची धमाल

फराळांनंतर देवीची आरती होते. आरतीनंतर पूजा करणार्‍या सुवासिनींनी नावे घेण्याची पद्धत आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा, बसफुगडी, टिपऱ्या खेळून रंगीत दोऱ्यांचा गोफ विणणे असे खेळ खेळले जातात. यासाठी एक लिंबू बाई दोन लिंबू झेलू, किस बाई किस दोडका किस यासारखी पारंपरिक गाणी म्हटली जातात. प्रामुख्याने ही गाणी माहेरचे वर्णन करणारी असतात. सासर आणि सासरच्या मंडळींना अनेक गाण्यांतून चांगले टोमणे लगावले जातात.

श्री मंगळागौरीची आरती 

जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।
रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।
मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।
तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया। ।१।।
पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।।
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।।
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली।।२।।
साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।३।।
डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।
शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।४।।
न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।५।।
सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।
करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।।६।।
लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।
मागुती परतु‍नीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।
देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।७।।

श्रावण महिना २०२० : श्रावण महिन्यातील खास व्रतांबद्दल जाणून घ्या!

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -