घरक्रीडाकॅचेस विन मॅचेस

कॅचेस विन मॅचेस

Subscribe

क्रिकेटमध्ये ‘कॅचेस विन मॅचेस’ याचा प्रत्यय नेहमीच येतो. भारताचा विजयरथ रोखणार्‍या यजमानांनीही ही बाब सार्थ ठरवली. तसे पाहिले तर हा महामुकाबला केवळ कॅचेसमुळे रंगतदार झाल्याचे दिसते. १६० धावांची सलामी देणार्‍या इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांची दमदार खेळी चांगल्या झेलमुळे संपुष्टात आली. बदली खेळाडू रविंद्र जाडेजाने रॉयचा घेतलेला अप्रतिम झेल भारताला सामन्यात परत घेऊन आला, पण विशाल लक्ष्याचा पाठलाग करणार्‍या भारताच्या रिषभ पंतच्या खेळीचा अंतही क्रिस वोक्सच्या अविस्मरणीय झेलमुळे झाला. यानंतर भारताच्या सामन्यातील विजयाच्या आशा काहीशा मावळल्याच होत्या. या सामन्यातील वैशिष्ठ्य म्हणजे बाद झालेले सर्व खेळाडू हे झेलबाद झाले आहेत. यातील जवळपास सर्वच झेल उत्कृष्ट होते.

यजमानांना या सामन्यात होम ग्राऊंड आणि तेथील वातावरणाचा, प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा फायदा होणार ही बाब निश्चित होती. मात्र, भारताची विजयी लय त्यांच्यासमोर तगडे आव्हान होते. दोन्हीही संघ तुल्यबळ होते. अशा स्थितीत केवळ अधिक चुका करणारा संघ पराभूत आणि सरस खेळ करणारा संघच विजयी ठरणार होता. झालेही नेमके तसेच. भारतीयांनी चुका अधिक केल्या आणि इंग्लंडने नेमक्या क्षणी सरस खेळ करत सामना खिशात टाकला.

- Advertisement -

पहिल्या डावाचा विचार केला, तर भारताने रॉयचा महत्त्वपूर्ण अडथळा दूर केला, तो केवळ जाडेजाने घेतलेल्या अप्रतिम झेलमुळे. यानंतर शतकी खेळी करणार्‍या बेअरस्टोचाही झेल रिषभ पंतने टिपला. इयॉन मॉर्गनचा अडसर केदार जाधवने उत्कृष्टरित्या झेल घेत दूर केला. मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नातील जॉस बटलरचाही अवघड झेल आपल्याच गोलंदाजीवर मोहम्मद शमीने घेतला.

विशाल लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनाही यजमानांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे रोखून धरले होते. शतकवीर रोहित आणि हार्दिक पांड्याचे बरेचसे अप्रतिम फटके इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांनी अप्रतिमरित्या अडवल्याने अनेकदा धावांची गती मंदावली. रोहितपाठोपाठ कोहली, पांड्याही झेलबाद झाले. मात्र, सर्वात कमनशिबी ठरला तो नवखा आक्रमक फलंदाज रिषभ पंत. क्रिस वोक्सने सीमारेषेजवळ डाईव्ह मारत घेतलेला अप्रतिम झेल पंतच्या विश्वचषकातील पहिल्याच खेळीचा अंत ठरला.

- Advertisement -

या झेलमुळे भारताची धावसंख्या मंदावली आणि विजयाचा पाठलाग करताना भारतीय संघावर दडपण आले. थोडक्यात ‘कॅचेस विन मॅचेस’ याचा प्रत्यय या सामन्यात प्रकर्षाने आला. भारताची कामगिरी निराशाजनक नव्हती. मात्र, यजमानांचा खेळ सरस ठरल्याने भारताला पराभूत व्हावे लागले. मात्र, दोन्ही संघांतील खेळाडूंची क्षेत्ररक्षणातील चपळता लक्ष वेधणारी ठरली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -