घरक्रीडाआयपीएल : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पहिल्या आठवड्याला मुकणार 

आयपीएल : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पहिल्या आठवड्याला मुकणार 

Subscribe

आयपीएल स्पर्धेत या दोन्ही संघांचे खेळाडू सुरुवातीच्या काही सामन्यांत खेळू शकणार नाही.    

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांचे खेळाडू इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या पहिल्या आठवड्याला मुकणार आहेत. ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून ४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत दोन संघांमध्ये मर्यादित षटकांची मालिका होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, तसेच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड यांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे युएईत १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत या दोन्ही संघांचे खेळाडू सुरुवातीच्या काही सामन्यांत खेळू शकणार नाही.

सहा दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल

ऑस्ट्रेलियन संघ सप्टेंबरच्या सुरुवातीला इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दोन संघांमध्ये तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होईल. टी-२० मालिकेचे सामने ४, ६, ८ सप्टेंबरला साऊथहॅम्पटन येथे, तर एकदिवसीय मालिकेचे सामने ११, १३, १६ सप्टेंबरला मँचेस्टर येथे होणार आहेत. ही मालिका १६ सप्टेंबरला संपणार असली तरी या दोन्ही संघांच्या खेळाडूंना २६ सप्टेंबरनंतर आयपीएल स्पर्धेत खेळता येईल. हे खेळाडू १७ किंवा १८ सप्टेंबरला युएईमध्ये दाखल होऊ शकतील. त्यानंतर त्यांना सहा दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल आणि त्यांची पहिल्या, तिसऱ्या, सहाव्या दिवशी कोरोना चाचणी होईल. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यास हे खेळाडू सातव्या दिवशी जैव-सुरक्षित वातावरणात प्रवेश करू शकतील.

- Advertisement -

राजस्थान रॉयल्सचे सर्वाधिक नुकसान

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांचे मिळून २९ खेळाडू आयपीएल खेळणार आहेत. यात डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, पॅट कमिन्स, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जॉस बटलर यांसारख्या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलच्या पहिल्या आठवड्याला मुकणार असल्याने राजस्थान रॉयल्स संघाचे सर्वाधिक नुकसान होईल. स्मिथ या संघाचे नेतृत्व करणार असून बटलर, आर्चर आणि स्टोक्स हे खेळाडूही राजस्थानकडून खेळतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -