RCB : आरसीबी कठीण परिस्थितीतही कशी जिंकतेय ? फाफ डुप्लेसीचा खुलासा

Faf Du Plessis
फॅफ डू प्लेसिस

फाफ डुप्लेसीच्या कर्णधारपदात खेळणाऱ्य़ा आरसीबीच्या संघाला पुन्हा एकदा विजय मिळवण्यात यश आले आहे. मंगळवारी आरसीबीने लखनऊ सुपर जायंट्सला १८ धावांनी पराभूत केले. या सीझनमध्ये पाचवा विजय आरसीबीने मिळवला आहे. या विजयासह आरसीबी पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. टॉस हरल्यानंतरही पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या आरसीबीने २० ओव्हरमध्ये ६ विकेट्स गमावत १८२ धावांचे टार्गेट दिले होते. त्यानंतर टार्गेटचा पाठलाग करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सने २० ओव्हरमध्ये ८ विकेट्स गमावत १६३ धावा केल्या.

आरसीबीच्या विजयाचा हिरो खऱ्या अर्थाने ठरला तो फाफ डुप्लेसी ७ धावांवर २ विकेट्स गमावल्यानंतरही संघाने चांगले कमबॅक केले. संघाला १८१ धावांपर्यंत पोहचवण्याचे काम फाफ डुप्लेसीच्या खेळीने केले. पण २० व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर डुप्लेसी बाद झाला. त्यामुळे सेंच्युरी करण्याची संधी त्याने गमावली. या खेळीमुळेच डुप्लेसीला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यात ६४ चेंडूत ९६ धावा डुप्लेसीने केल्या. याआधीही डुप्लेसी आयपीएलमध्ये ९४, ९५,९६ अशा धावांवर बाद झाला आहे. त्यामुळे आयपीएल फॉरमॅटमध्ये अजुनही तो विजयाच्या शोधात आहे.

डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ३७ वर्षीय फाफ डुप्लसीने २० ओव्हर फलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये फिल्डिंगही केली. तसेच उत्तम पद्धतीने कर्णधार पदाची धुरा सांभाळत टीमला विजयही मिळवून दिला. डुप्लेसीने स्पष्ट केले की या मैदानातील रचनेमुळे तुम्हाला याठिकाणी धावांसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मोठे मैदान असल्याने याठिकाणी अनेक धावा पळूनच काढाव्या लागतात. फिटनेस वाढवण्यासाठीची ही एक चांगली पद्धत असल्याचेही डुप्लेसीने स्पष्ट केले.

आम्ही आज सुरूवातीलाच अडचणीत होतो. पण अशी परिस्थिती ही गेल्या तीन ते चार सामन्यांमध्येही होती. पण आमच्या संघाची एक चांगली सवय समोर आली आहे, ती म्हणजे कठीण परिस्थितीतही आम्ही संघ म्हणून चांगली कामगिरी करू शकतो. तसेच संयमाने आम्ही खेळी करतो आहोत हे महत्वाचे. शेवटच्या ओव्हरमध्ये आम्ही अतिशय खतरनाक टीम म्हणून नावलौकिक मिळवला आहे. आजही आमच्या संघाने केलेल्या कामगिरीसाठी मी सर्वच खेळाडूंचा आभारी आहे.

दुसऱ्या क्रमांकावर मजल

आरसीबीच्या टीमने आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये ५ सामन्यात विजय मिळवत गुजरात टायटन्सच्या पाठोपाठ पॉइंट्स टेबलमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे. दोन्ही संघांमध्ये १० गुण बरोबरीचे आहेत. पण गुजरातने ६ सामन्यांमध्ये हे पॉइंट्स मिळवले आहेत. आता आरसीबीने ५ पैकी चार सामने जिंकले आहेत. हीच कामगिरी यापुढेही सुरू राहिली तर आरसीबीला प्ले ऑफमध्ये जागा मिळवणे सोपे ठरू शकते.