घरक्रीडामहेंद्रसिंग धोनीचा मीसुद्धा चाहता,पण भविष्याचा विचार करणे गरजेचे!

महेंद्रसिंग धोनीचा मीसुद्धा चाहता,पण भविष्याचा विचार करणे गरजेचे!

Subscribe

माहीचा (महेंद्रसिंग धोनी) मीसुद्धा खूप मोठा चाहता आहे, पण भविष्याचा विचार करुन युवकांना संधी देणे गरजेचे आहे, असे मत बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष एम. एस. के प्रसाद यांनी व्यक्त केले. माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज धोनी मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारतीय संघाकडून खेळलेला नाही. मात्र, धोनीने यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यास त्याचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकेल असे भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. परंतु, निवडकर्ते म्हणून भूतकाळाचा नाही, तर भविष्याचा विचार करणे आमचे काम आहे, असे प्रसाद यांनी एका मुलाखतीत सांगितले.

युवकांना पाठिंबा देण्याचा आणि त्यांना संघातील स्थान पक्के करण्यासाठी जास्तीतजास्त संधी देण्याचा आमचा प्रयत्न असतो. निवडकर्ता म्हणून बोलायचे नसेल, तर मीसुद्धा धोनीचा मोठा चाहता आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने दोन विश्वचषक जिंकले, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली, कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले. त्यामुळे त्याच्या योगदानाबाबत कोणीही काही प्रश्न उपस्थित करु शकत नाही. निवृत्त व्हायचे की नाही, हा सर्वस्वी धोनीचा निर्णय आहे. मात्र, निवडकर्ते म्हणून आम्हाला भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे. भविष्यात कोणते खेळाडू यशस्वी होऊ शकतील ते ओळखून, त्यांना संधी देणे हे आमचे काम आहे, असे प्रसाद म्हणाले.

- Advertisement -

भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने विश्वचषकानंतर धोनीला वगळून युवा रिषभ पंतला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, पंतला या संधीचा फारसा उपयोग करता आला नाही. त्यामुळे कसोटी संघात त्याची जागा वृद्धिमान साहाने, तर एकदिवसीय आणि टी-२० संघात लोकेश राहुलने घेतली.

रोहितची कामगिरी कौतुकास्पद!

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने मागील वर्षी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने विश्वचषकात विक्रमी ५ शतके लगावली. तर कसोटी संघातही त्याने आपले स्थान पक्के केले. त्याचे कौतुक करताना एम. एस. के प्रसाद म्हणाले, रोहित आता क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत यशस्वी होत आहे. त्याने आपल्या खेळात खूप सुधारणा केली आहे. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये किती उत्कृष्ट फलंदाज आहे, हे आपल्याला माहित आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळताना त्याने मागील पाच-सहा महिन्यांत केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. तो परदेशातही अशीच कामगिरी करेल अशी मला आशा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -