घरक्रीडाWorld Cup 2019: टीम इंडियासमोर विंडीजची धूळदाण! दणक्यात मिळवला विजय!

World Cup 2019: टीम इंडियासमोर विंडीजची धूळदाण! दणक्यात मिळवला विजय!

Subscribe

वेस्ट इंडीजविरूद्धच्या सामन्यामध्ये टीम इंडियानं दणदणीत विजय मिळवत वर्ल्डकपमधली आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. या विजयासह भारताचे ११ गुण झाले आहेत.

अफगाणिस्तानविरोधात भारतीय बॅटिंग ऑर्डरमधले कच्चे दुवे उघडे पडल्यानंतर वेस्ट इंडीजविरूद्धच्या सामन्यामध्ये भारतीय टीमचा परफॉर्मन्स कसा राहातो? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र, अफगाणिस्तानविरूद्धच्या मॅचमधले कच्चे दुवे हेरून त्यामध्ये सुधारणा करत आज टीम इंडियाने कॅरेबियन टीमला दिमाखात पराभूत करून आपण विश्वचषकाचे प्रबळ दावेदार का आहोत, हे जगाला दाखवून दिलं. टॉस जिंकून आधी बॅटिंग करण्याचा निर्णय कॅप्टन विराट कोहलीनं घेतला, तेव्हाच विजयाची सुरुवात झाली होती. त्यापुढे भारताची टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरनं रनांचा रतीब घालत वेस्ट इंडिजपुढे जिंकण्यासाठी २६९ धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान भारतीय बॉलिंगच्या तिखट माऱ्यापुढे वेस्ट इंडीजला पेलवलं नाही. आणि त्यांचा या सामन्यात पराभव झाला. या विजयासह भारताचे न्यूझीलंडसोबत ११ गुण झाले आहेत.

कोहली, धोनीची अर्धशतकं!

पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतानं आश्वासक सुरुवात केली. के. एल. राहुल आणि हिटमॅन रोहीत शर्मा यांनी सावध खेळ करत डावाला आकार द्यायला सुरुवात केली. मात्र, सहाव्या ओव्हरमध्ये केमार रोचनं रोहीत शर्माला एलबीडब्ल्यू आऊट केलं आणि भारताची अवस्था २९ रनांवर १ बाद अशी झाली. या विकेटबद्दल संभ्रम असूनही तिसऱ्या पंचांनी रोहीतला आऊट दिलं. त्यानंतर मैदानावर आलेल्या विराट कोहलीनं राहुलसोबत भारताच्या डावाला आकार दिला. तिसऱ्या विकेटसाठी ७१ रनांची भर टाकल्यानंतर राहुल होल्डरच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्याचं अर्धशतक अवघ्या २ रनांनी हुकलं. त्यानंतर आलेला विजय शंकर(१४) आणि केदार जाधव (७) स्वस्तात माघारी परतल्यानंतर महेंद्रसिंह धोनी मैदानात उतरला. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. आज त्यानं त्याच्या टीकाकारांना चोख उत्तर दिलं. ६१ बॉलमध्ये ५६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी धोनीनं केली. त्यामध्ये ३ चौकार आणि २ खणखणीत षटकारांचा समावेश होता.

- Advertisement -

धोनी-पंड्याची फटकेबाजी!

वन डाऊन आलेल्या विराट कोहलीनं त्याचा फॉर्म कायम राखत पुन्हा अर्धशतक ठोकलं. त्यानं वनडे, कसोटी आणि टी २० या तिन्ही फॉर्मॅटमध्ये मिळून २० हजार धावांचा टप्पाही ओलांडला. भारताकडून सर्वात वेगवान २० हजार धावा करणारा तो फलंदाज ठरला. त्याने ८२ बॉलमध्ये ७२ रनांची खेळी केली. त्यामध्ये अवघा १ चौकार आणि १ षटकार होता. कोहली आऊट झाल्यानंतर मैदानावर आलेल्या हार्दिक पंड्यानं त्याचं काम चोख बजावलं. अवध्या ३८ बॉलमध्ये ५ चौकारांसह त्यानं ४६ धावा फटकावल्या. धोनी आणि पंड्यानं शेवटच्या षटकांमध्ये केलेल्या हाणामारीच्या जोरावर भारतानं विंडीजसमोर २६९ रनांचं आव्हान ठेवलं.

भारतीय बॉलर्सचा तिखट मारा!

भारतीय गोलंदाजांच्या तिखट माऱ्यापुढे वेस्ट इंडीजची अपेक्षेप्रमाणे भंबेरी उडाली. पाचव्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीनं धोकादायक ख्रिस गेलचा अडथळा दूर केला. सातव्या ओव्हरमध्ये पुन्हा शमीनं होपला माघारी धाडत विंडीजच्या मॅच जिंकण्याच्या होपला दुसरा धक्का दिला. तेव्हा विंडीजची अवस्था होती ७ ओव्हरमध्ये १६ रनांवर २ विकेट! अंबरिस आणि पूरननं विंडीजच्या डावाला आकार द्यायला सुरुवात केली. मात्र, ही जोडी धोकादायक होऊ लागलेली असतानाच पंड्यानं अंबरीसला वैयक्तिक ३१ रनांवर पायचीत केलं. त्यापाठोपाठ कुलदीप यादवनंही पूरनला वैयक्तिक २८ रनांवर शमीकडून झेलबाद केलं. आणि विंडीजची अवस्था ८० रनांवर ४ विकेट अशी झाली. त्यानंतर विंडीजच्या कोणत्याही बॅट्समनला सेट होऊन मोठी भागीदारी करता आली नाही. परिणामी भारतानं विंडीजवर मोठा विजय मिळवला. १२५ रनांनी भारतानं विंडीजला पराभूत केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -